
‘एक्सक्युज मी’ असे इंग्रजीत शब्द वापरले म्हणून दोन तरुणींना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा डोंबिवलीत घडली. या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून मारहाण करणारे अनिल पवार, बाबासाहेब ढबाले, रितेश ढबाले यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या डोंबिवलीतील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या गीता जैन या आपल्या मैत्रिणीसोबत रात्री पावणेबाराच्या सुमारास रस्त्याने जात होत्या. त्यावेळी रस्त्याच्या मध्ये अनिल पवार, बाबासाहेब ढबाले व रितेश ढबाले असे तिघेजण उभे होते. या तिघांना बाजूला व्हा, असे सांगण्यासाठी गीता जैन यांनी ‘एक्सक्युज मी’ अशी इंग्रजीतून विनंती केली. त्यावर इंग्रजी नको मराठीत बोला असे सांगत या त्रिकुटाने वाद घातला. एवढेच नव्हे तर त्यांनी गीता जैन व त्यांच्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.