इंग्लंडचा त्रिशतकी विजय; दुसऱ्या कसोटी विजयासह मालिकाही जिंकली

हिंदुस्थानचा मायदेशात 3-0 ने धुव्वा उडवणाऱ्या न्यूझीलंडला आता आपल्याच मायदेशात दारुण पराभवांना सामोरे जावे लागत आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पहिली कसोटीही इंग्लंड 8 विकेटनी जिंकली होती.

बेन डकेट (92) आणि जेकब बेथेल (96) यांच्यानंतर जो रुटच्या (106) शतकाच्या जोरावर इंग्लंडने 6 बाद 427 धावांवर आपला डाव घोषित करत न्यूझीलंडसमोर 583 धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. इंग्लंडने न्यूझीलंडची 4 बाद 59 अशी अवस्था करत आपला मालिका विजय निश्चित केला होता. पण मधल्या फळीत टॉम ब्लंडलने 102 चेंडूंत 13 चौकार आणि 5 षटकार खेचत संघाच्या पराभवाचे अंतर कमी केले. न्यूझीलंडचा डाव 259 धावांवर आटोपत इंग्लंडने मालिका जिंकली. कसोटीत 123 आणि 55 धावांची खेळी करणारा हॅरी ब्रुक ‘सामनावीर’ ठरला.

रुटचा शतकी वेगाने सचिनचा पाठलाग

सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमी 15,921 कसोटी धावांचा शतकी वेगाने पाठलाग करणाऱया इंग्लिश फलंदाज जो रुटने 36 वे कसोटी शतक झळकावत 12,886 धावांपर्यंत मजल मारली आहे. आता तो फक्त 3035 धावा मागे आहे. तसेच त्याने 36 व्या शतकासह राहुल द्रविडच्या 36 शतकांचीही बरोबरी साधली. आता रुटपुढे सचिन (51), पॅलिस (45), पॉण्टिंग (41) आणि संगक्कारा (38) हे चार शतकवीर आहेत. रुटचे हे या वर्षी सहावे शतक असून त्याने 16 कसोटी सामन्यांत 1470 धावा केल्या आहेत. तो अजून एक कसोटी खेळणार असून त्याला कसोटी इतिहासात 1500 पेक्षा अधिक धावा करणारा नववा फलंदाज होता येऊ शकते.