हिंदुस्थानचा त्यांच्या घरात 3-0 ने धुव्वा उडवल्यानंतर न्यूझीलंडला आपल्या मायभूमीत इंग्लंडकडून 2-0 ने कसोटी मालिका गमवावी लागली होती. मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने केन विल्यमसनच्या विक्रमी 33 व्या शतकी खेळीच्या जोरावर सर्व बाद 453 अशी मजल मारत इंग्लंडसमोर विजयासाठी 658 धावांचे अवघड आव्हान ठेवले आहे. तसेच तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची 2 बाद 18 अशी अवस्था करत आपल्या पराभूत मालिकेचा शेवट विजयी करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. इंग्लंडला आता सामना जिंकण्यासाठी उर्वरित दोन दिवसांत 640 धावांची गरज आहे.
इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी जिंकून आधीच मालिका खिशात घातली आहे. तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात त्यांनी 347 धावा केल्या आणि इंग्लंडचा 143 धावांत खुर्दा पाडत 204 धावांची निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर केन विल्यमसनने 156 धावांची विक्रमी खेळी करताना विल यंग (60), रचिन रवींद्र (44)आणि डॅरील मिचेल (60) यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण भागी रचत संघाला त्रिशतकापलीकडे नेले. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 33 वे शतक ठोकत सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 11 वे स्थान संपादले.
विल्यमसन बाद झाल्यानंतर टॉम ब्लंडल (नाबाद 44) आणि मिचेल सॅण्टनर (49) यांनी संघाची मजल 450च्या जवळ नेली. न्यूझीलंडने शेवटचे 3 फलंदाज 10 धावांत गमावले आणि त्यांचा डाव 453 धावांवर संपला. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 658 धावांचे अवघड आव्हान ठेवले गेले. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री आणि टीम साऊदीने एकेक विकेट घेत इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना 18 धावांत टिपले. इंग्लंडचा आक्रमक खेळ पाहाता कसोटीचा निकाल चौथ्या दिवशीच लागणार हे निश्चित आहे.