इंग्लंड आणि डरहमचा सुपरफास्ट गोलंदाज ब्रायडन कार्सवर सट्टेबाजीप्रकरणी 3 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला 2017 ते 2019 या कालावधीत 303 सट्टा लावल्याबद्दल दोषी ठरवले आहे. यानंतर बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीदरम्यान त्याला 16 महिन्यांची शिक्षा सुनावली असून 13 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला 28 ऑगस्टपर्यंत कोणताही क्रिकेट सामना खेळता येणार नाही.
कार्सने तपासात सहकार्य केले असून त्याच्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत. तसेच ज्या सामन्यांमध्ये तो खेळला नाही, त्या सामन्यांवरच कार्स सट्टा लावत असल्याचेही समोर आले आहे. कार्सने आपल्या चुकांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. कार्स म्हणाला की, मी हे काम अनेक वर्षांपूर्वी केले असले तरी, बोर्डासमोर मी कोणतीही खोटी साक्ष देणार नाहीय. तसेच त्याने त्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल ईसीबी, डरहम क्रिकेट आणि पीसीएचे आभार मानले. कार्स पुढे म्हणाला की, बंदीच्या काळात पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम करेल.
ब्राइडन कार्सच्या या सट्टेबाजी प्रकरणात इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्या बंदीला पाठिंबा दिला होता. बोर्डाने म्हटले आहे की, ते अशा बाबी अतिशय गांभीर्याने घेतात आणि क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देत नाही. कार्सने आपल्या चुका मान्य केल्या असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे बोर्डाने म्हटले आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. बोर्डाने कार्सबद्दल समाधान व्यक्त करताना इतर क्रिकेटपटूंनाही यातून शिकण्यास सांगितले आहे.