
एकदिवसीय सामन्यांमध्ये फलांदाजी करणे ही वेगळी गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून अपयश येत असले तरी अद्यापही एकदिवसीय सामन्यांमध्ये धावा करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी कधीच निवृत्त झालो नव्हतो किंवा एकदिवसीय क्रिकेट खेळणार नसल्याचे मी कधीही बोललो नाही, असे मत इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रूटने बोलून दाखवले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंड शनिवारी (दि. 22) ऑस्ट्रेलियविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाला दुखापतीने ग्रासले असले तरी इंग्लंडला गेल्या काही एकदिवसीय मालिकांमध्ये वारंवार अपयशाला सामोरे जावे लागल्यामुळे उद्याच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी रूट म्हणाला, सलग चार एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी उद्या मैदानात उतरणार आहे.