अभियांत्रिकी विद्यार्थ्याला घरमालकाकडून क्रूरपणे मारहाण; निकृष्ट सुविधांना कंटाळून गूगलवर दिले होते 1 स्टार रेटिंग!

कर्नाटकमध्ये एका 18 वर्षांच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अतिशय क्रूरपणे मारहाण करण्यात आली. चार जणांनी मिळून या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याला अतिशय क्रूरपणे मारलेले आहे. सदर विद्यार्थ्याने केलेल्या आरोपानुसार, बाॅईज पेइंग गेस्ट मालकाने आणि त्याच्या साथीदारांनी अतिशय क्रूरपणे त्याला मारले. विकास असे या मुलाचे नाव असून, तो कलबुर्गी येथील राहणारा आहे. विकास ज्या ठिकाणी पीजी राहात होता त्याला त्याने कमी रेटिंग दिल्यामुळेच विकासला क्रूरपणे मारण्यात आले. 17 मार्चच्या रात्री या मुलाला मारहाण करण्यात आली होती.

 

पीजी मालक आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला करुन झाल्यानंतर, त्याच्याकडून जबरदस्ती त्याने दिलेले रेटिंग काढायलाही लावले. कादरी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून, मारहाण झालेला विद्यार्थी कलबुर्गी येथील रहिवासी आहे.

विकास गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी पीजी म्हणून राहात होता. परंतु पीजी म्हणून राहताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. म्हणूनच त्याने वैतागून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्याचा निर्णय घेतला. निकृष्ट सुविधांमुळे विकासने गूगलवर सदर पीजीबद्दल 1 स्टार रेटिंग दिला. त्याचबरोबर अस्वच्छ वातावरण आणि वाईट शौचालय तसेच खाण्यातील पदार्थांमध्ये किडे अशी प्रतिक्रिया त्याने गूगलवर टाकली होती. हे सर्व घरमालकाने पाहिल्यानंतर विकासला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. सध्याच्या घडीला विकासने दाखल केलेली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी पीजी मालक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.