राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये 20 जणांनी तर पीसीबी ग्रुपमधून 17 अशा एकुण 37 जणांनी 100 पर्सेंटाईल मिळवले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 100 पर्सेंटाईल मिळवणाऱया विद्यार्थ्यांची संख्या यंदा 9 ने वाढली आहे.
सीईटी परीक्षेला एकूण 7 लाख 25 हजार 52 जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी परीक्षेला बसलेले सर्व 6 लाख 75 हजार 377 विद्यार्थी पात्र ठरले असून एकूण 93.15 टक्के इतका निकाल लागला आहे. या सीईटीसाठी पीसीएमच्या परीक्षेला 3 लाख 14 हजार 675 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 95 हजार 577 जण परीक्षेला बसले होते. तर पीसीबीसाठी 4 लाख 10 हजार 377 जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 3 लाख 79 हजार 800 जाण परीक्षेला बसले होते. यात दोन्ही ग्रुपसाठी परीक्षेला बसलेल्या एकुण 6 लाख 75 हजार 377 जण पात्र ठरले आहेत.
पीसीबी ग्रुपमध्ये 100 पर्सेंटाईल मिळवलेल्या मुंबईतील 7 जणांचा समावेश आहे. यात विक्रम सन्मय, अभिषेक झा, पुष्कर ब्यादगी, मैत्रेय वाळिंबे, मोक्ष पटेल, वंशिका शाह, प्रणव अरोरा, यांचा समावेश आहे. तर ठाण्यातील दूर्गप्रसाद आद्या, मोहमद इस्माईल नाईक, मृदूल जोशी यांचा समावेश आहे.
ओबीसी प्रवर्गातून पीसीबीमध्ये सहा विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवले असून त्यात अमरावती येथील श्रावणी छोटे, श्रेया विलास यांचा आणि पीसीएममध्ये दोन विद्यार्थी असून यात नागपूर येथील पार्थ पद्मभूषण, दत्तात्रय आर्या यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जातीमधून दोघांनी 99.99 पसेंटाईल मिळवले असून यात एक मुंबईतील परेश क्षेत्री आणि नागपूर येथील उदय साना यांचा यांचा समोवश आहे. अनुचित जमातीमधून अकोल्यातील गजानन सृजन आणि रांची येथील अरविंद सुर्यांश यांनी अनुक्रमे 99.97 आणि 99.99 पर्सेटाईल मिळवले आहे. तर डीटी, व्हीजेमधून नाशिक येथील रिहान इनामदार आणि रांचीतील भारत मंथन यांचा समावेश आहे.
कॅप राऊंडचे वेळापत्रक लवकरच
सीईटीच्या निकालानंतर राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी महाविद्यालयातील पदवी प्रवेशाच्या कॅप राऊंडचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या पॅप राऊंडच्या माध्यमातून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया राबवली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका
सीईटी सेलकडून सायंकाळी 6 वाजता, एमएचटी-सीईटी-2024 या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, मात्र त्यानंतर लगेच सीईटी सेलचे सर्व्हरच डाऊन झाल्याने असंख्य विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत आपला निकाल पाहता आला नाही. यासाठी सुमारे हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडून विचारणा केली, काहींनी तक्रारी केल्या. सीईटी सेलच्या कारभाराबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.