इंजिन कंट्रोल प्रणाली कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; राजस्थानातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या

कारमधील इंजिन कंट्रोल युनिट (इसीयू) प्रणाली हॅक करून महागडी कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या पद्धतीने कार चोरी करणाऱ्या दोघांना थेट राजस्थानमधून ताब्यात घेऊन चोरीच्या दोन क्रेटा कारसह गुन्ह्यात वापरलेली आय 20 कार पोलिसांनी जप्त केली.

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दोन दिवस चोरट्यांनी राष्टा कार लयास केल्याची घटना एएस क्लब आणि स्वामी समर्थनगर सिडको वाळूज महानगर-1 परिसरात घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात श्रीरंग पांडुरंग शेळके व संगीता अरुण कोटमे यांच्या तक्रारीवरून वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कार चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सलग दोन दिवस दोन कार लंपास केल्याच्या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या दोन्ही गाड्यांचा तपास करा, असे आदेश एमआयडीसी वाळूज पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या पथकाने कसून तपास सुरू केला होता. दोन्ही गुन्हा घडलेल्या ठिकाणी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित आय 20 कार दिसली, त्यामुळे हा गुन्हा या कारचा वापर करून झाला असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला असता सदरील कार ही करोडी टोलनाक्यावर आढळून आली. त्याठिकाणी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारचा नंबर मिळाल्यानंतर पोलिसांनी कार मालकास ताब्यात घेतले. मात्र, त्याने ही कार दोन वर्षापूर्वी आर्थिक व्यवहारातून आरोपी फिरोज सरदार शेख (26, रा. जराडा, ता. मल्हारगड, जि. मनोसर, मध्यप्रदेश) याला विकली असल्याचे सांगितले.

दरम्यान, आरोपी फिरोज शेखचा मोबाईल नंबर मिळविला. पोलिसांनी या मोबाईल लोकेशनच्या आधारे माग काढत थेट मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशहून राजस्थान गाठले. पोलिसांनी फिरोज शेख याला ताब्यात घेतले असता दुसरी क्रेटा कार आरोपी आशिक अली इकबाल अली (30, रा. रतलाम, मध्यप्रदेश) याने चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

कार हॅक करणारा आरोपी फरार

इंजिन कंट्रोल युनिट (इसीयू) प्रणालीचा वापर, कारचोरी करण्यात पटाईत असलेला मुख्य कारचोर हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला आहे. तो 2019 पर्यंतच्या कारचा इंजिन कंट्रोल युनिट (इसीयू) सिस्टीम हॅक करून कार चोरी करत होता. चोरी केलेल्या कार परराज्यात घेऊन जाण्याचे काम हा टोळीतील सदस्य करत होता. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेताच तो फरार झाला असून त्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

कारवाई ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके, पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड, नवनाथ खांडेकर, पोलीस अंमलदार शाम आडे, अमोल शिंदे, अमोल मुगळे, चालक तातेराव शिनगारे, तर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस अंमलदार यशवंत गोबाडे, हनुमंत ठेके, समाधान पाटील, किशोर साबळे, शिवनारायण नागरे यांच्या पथकाने केली.