चार कोटी घरे दिली म्हणतात. ही घरे कुणाला दिली आणि कुणी पाहिली? हे सगळं थोतांड आहे, फसवाफसवी आहे, असा घणाघात करतानाच हे खोटय़ाचं नाटक बंद पाडा. गावागावात जाऊन मोदी सरकारच्या खोटय़ा दाव्यांचा बुरखा फाडा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तमाम शिवसैनिकांना केले.
‘युवा परिवर्तन की आवाज’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वाखालील निष्ठा यात्रा मुंबईत दाखल झाली असून ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी पांडे यांनी गावागावात ऐकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. महाविकास आघाडी सरकार असताना बळीराजा सुखी होता. आता मात्र मिंधे सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे. बळीराजा संकटांच्या कात्रीत सापडला आहे, असे निहाल पांडे यांनी सांगितले. पीक विमा योजनेच्या नावाखाली फसवाफसवी सुरू आहे. त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि राज्यातील मिंधे सरकारचा खरपूस समाचार घेतला.
सगळी फसवाफसवी सुरू आहे. विकास रथ फिरवत आहेत. ते थोतांड आहे. चार कोटी घरे आम्ही दिली म्हणतात, पण ती कोणाला दिली याचा काहीच अतापता नाही. या फसवेगिरीचा बुरखा फाडावाच लागेल. त्यासाठी गावागावात जाऊन लोकांना आपल्याला विचारावे लागेल. तुला घर मिळाले का, तुला उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला का, अशी विचारणा करावी लागेल. म्हणजे खोटे बोलणारे उघडे पडतील, असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.
वर्धा ते मुंबई निष्ठा यात्रा
निहाल पांडे यांच्या नेतृत्वाखालील निष्ठा यात्रेने वर्धा ते मुंबई असा 864 किलोमीटर प्रवास केला. पांडे आणि त्यांचे सहकारी सायकलने मुंबईत दाखल झाले. ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पांडे यांचे कौतुक केले. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब उपस्थित होते. ‘जन की पुकार, ठाकरे सरकार… अब की बार ठाकरे सरकार’ असा नारा देत निहाल पांडे यांनी ही यात्रा काढली.
आम्ही काहीतरी मोठं काम केलंय असे देशभरात मोदी सरकारकडून दाखवलं जात आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीच केलेले नाही. सगळं खोटय़ाचं नाटक आहे. माझ्या गावात नाही दुसऱ्या गावात विकास झाला असेल असे प्रत्येकाला वाटत आहे. पण जेव्हा सगळे एकमेकांशी बोलतील तेव्हा लक्षात येईल की, कोणालाच काही मिळालेले नाही. त्यामुळेच ‘होऊ दे चर्चा’ मोहीम गावागावात राबवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.