
खारघर कब्रस्तानसमोरील मोकळी जागा भंगारमाफिया व फुलझाडे व्यावसायिकांनी बळकावली असून याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. याची दखल घेत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालिकेवर धडक देत या अतिक्रमणावर तत्काळ कारवाई करतानाच येथील उघडा नाला भूमिगत करून अवजड वाहतुकीसाठी वाहनतळ उभारावे अशी मागणी केली आहे.
खारघर सेक्टर १३ मध्ये कब्रस्तान असून त्यापुढे रस्त्यालगत जवळपास २०० मीटर लांब नाला आहे. मोक्याच्या असलेल्या या जागेवर भूमाफियांनी बस्तान बसवले आहे. हात ओले होत असल्यानेच अधिकारी या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख व प्रकल्पग्रस्त शिवतेज टेम्पोचालक-मालक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील व अन्य शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांची भेट घेत याकडे लक्ष वेधले.
अतिक्रमण काढून या ठिकाणी उघडा नाला भूमिगत केल्यास वाहनतळ उभे राहील असे शिवसेनेने निदर्शनास आणून दिले. या ठिकाणी किमान २०० वाहने उभी राहतील असेही भरत पाटील यांनी सांगितले. यावेळी दीपक घरत, समन्वयक अवचित राऊत, महानगरप्रमुख सुनील पाटील, प्रवीण जाधव, सुनील पाटील, भगवान महाराज उपस्थित होते.