शिवडीतील बस थांब्यावर खासगी विकासकाचे अतिक्रमण; शिवसेनेची बेस्ट परिवहन विभागाकडे लेखी तक्रार

शिवडी येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील शिवाजीनगर बेस्ट बस थांब्यावर खासगी विकासकाने अतिक्रमण केले आहे. बस थांब्याला चिकटूनच या विकासकाने इमारतीचे बांधकाम केले असून त्यासाठी हा बस थांबाच अन्यत्र स्थलांतरित करण्याचा डाव आखला जात आहे. शिवाजीनगर बेस्ट बस थांबा अन्यत्र हलविल्यास येथील स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेने याविरोधात बेस्ट परिवहन विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या स्थापनेपासून शिवडी शिवाजीनगर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेस्ट बसथांबे अस्तित्वात आहेत. मात्र येथे एका खासगी विकासकाने इमारत बांधकाम करताना फुटपाथसह बेस्ट बस थांबादेखील गिळंकृत करण्याचा डाव साधला आहे. वास्तविक कुठलेही बांधकाम करताना फुटपाथपासून 20 फूट जागा सोडणे आवश्यक आहे, मात्र या विकासकाने सदर बांधकाम करताना हा नियमच पायदळी तुडवला आहे.

शिवसेना, युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहसचिव ऍड. मेराज शेख यांनी या अतिक्रमणाविरोधात बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंहल यांच्याकडे तक्रार केली आहे. पुनर्विकासाला आमचा विरोध नाही, पण अतिक्रमण आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने शिवाजीनगर येथील दोन्ही मार्गावरील (अप-डाऊन) बस थांबे अन्यत्र स्थलांतरित करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी ऍड शेख यांनी केली आहे.

बस थांबे हलविल्यास नागरिकांची गैरसोय

शिवाजीनगर बस थांबा अन्यत्र हलविल्यास दररोज बेस्ट बसने प्रवास करणारे नागरिक, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय होणार आहे. सध्या शिवाजीनगर बेस्ट बस थांब्यावर बस मार्ग क्रमांक 10, 45, 46 आणि 49 या बसेस धावतात. बस मार्ग क्रमांक 10 इलेक्ट्रिक हाऊस ते धारावी, 45 – मंत्रालय ते नाडकर्णी पार्क आणि 46 व 49 भाऊचा धक्का ते माहीम कॉजवे या मार्गावर धावतात. हे चारही मार्ग अत्यंत रहदारीचे असून मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारे आहेत. त्यामुळे बस थांबा अन्यत्र हलविल्यास नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्यामुळे विकासकाच्या फायद्यासाठी बेस्टने प्रवाशांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी ऍड. शेख यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.