जम्मू-कश्मीरमध्ये चकमक सुरूच; जवान शहीद, आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा; चारजणांना अटक

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीरच्या उधमपूर जिह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून चकमक सुरूच आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना हवालदार झंटू अली शेख यांना वीरमरण आले. तर दोन दहशतवाद्यांना पंठस्नान घातल्यानंतर आज आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, लश्कर तोयबाच्या दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत करणाऱ्या चौघांना बांदीपुरा पोलिसांनी अटक केली आहे

दुदु-बसंतगड परिसरातील जंगलात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी शोधमोहीम आणखी तीव्र केली. लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त शोधमोहीम राबवली. शोधमोहीम सुरू असताना अचानक दहशतवाद्यांकडून  गोळीबार सुरू झाला. त्याला लष्कराचे जवान आणि पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याची माहिती व्हाईट नाईट कॉर्प्सने ‘एक्स’वरून दिली आहे. या चकमकीत आपला एक जवान गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सर्वोत्तम उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तंगमर्ग येथील जंगलात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.

पूंछ जिह्यात घेराबंदी आणि शोधमोहीम

पूंछ जिह्यातील जंगल भागात संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली आहे. या परिसरात संशयित दहशतवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर लसाना वनपट्टय़ात दक्षता वाढवण्यात आली. 14 एप्रिल रोजी या भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकडय़ा या परिसरातही दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.