
जम्मू-कश्मीरच्या कठुआ येथे नियंत्रण रेषेजवळ हीरानगर सेक्टरमध्ये आज सायंकाळी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली. दहशतवाद्यांच्या अंधाधुंद गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी जंगलात पळून गेले. तब्बल तीन तास गोळीबार सुरू होता. धुक्यामुळे दूरवरचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे ऑपरेशन थांबवण्यात आले. सकाळी पुन्हा दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
दहशतवाद्यांकडून अशाप्रकारे अचानक हल्ला करण्यात आल्यामुळे जम्मू-कश्मीर तसेच अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एलओसीजवळ 5 किलोमीटर दूर सान्याल गावाजवळच्या जंगलात 4 ते 5 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. दरम्यान, या धुमश्चक्रीत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
कुटुंबाला ठेवले होते ओलीस
दहशतवाद्यांनी एक सात वर्षांची मुलगी आणि तिचे आई-वडील यांना ओलीस ठेवले होते. परंतु, संधी मिळताच या महिलेने सुटका करून घेण्यासाठी पळ काढला. यावेळी दहशतवाद्यांनी तिला गोळय़ा घालून ठार मारण्याची धमकी दिली. परंतु, ती धावतच राहिली. त्यानंतर तिच्या पतीनेही मुलीसह पळ काढला. यादरम्यान, मुलगी किरकोळ जखमी झाली.
मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त
हिंदुस्थानी लष्कराने पुँछ जिह्यातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र साठा आणि स्फोटके हस्तगत केली. राष्ट्रीय रायफल्स आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष पथकाने दिवसभर दहशतवाद्यांची शोध मोहीम राबवली यावेळी तीन एके रायफल्स, 23 मॅगझिन. 922 राऊंड्स, सात ग्रेनेड, 19 डिटोनेटर, तीन कॉर्टेक्स मीटर्स, एक चार इंचाचा सिलेंडर, 200 गॅम हेरॉईन आणि चार आयईडी हाती लागली.