शौचालयाला जाण्यासाठी मॅनेजरची परवानगी आवश्यक, कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला ऑफिस ग्रुपचा चॅट

कर्मचाऱ्याने कार्यालयात आल्यानंतर इतके तास काम करायला हवे यासाठी मॅनेजरकडून सातत्याने दबाव टाकला जातो. परंतु एका कर्मचाऱ्याने ऑफिस ग्रुपची चॅटिंग सोशल मीडियावर शेअर केली असून कर्मचाऱ्याला जर शौचालयाला जायचे असेल तर मॅनेजरची परवानगी घ्यावी लागते, असे म्हटले आहे. शौचास जाण्यासाठी अतिरिक्त ब्रेक घेतला तर ओरडा मिळू शकतो असे सांगत एका नेटकऱ्याने रेडिटवर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या चॅटनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसभरातील ब्रेकसाठी 60 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे कितीही वेळा ब्रेक घेतलात तरी तो 60 मिनिटांच्या वर जाणार नाही, अशी तंबीच दिलेली आहे. तसेच प्रत्येक वेळी ब्रेकला जाण्याआधी मॅनेजरची परवानगी घेण्याचाही नियम बनवण्यात आला आहे. त्यानुसार ग्रुपमध्ये ब्रेक घेताना ब्रेकची माहिती द्यावी लागते. 10-15 मिनिटांचा ब्रेक घेता तेव्हा तुमचा पुढचा ब्रेक 60 मिनिटांतून वजा करूनच घ्यायचा आहे. एका दिवसातील एपूण ब्रेक 60 मिनिटांच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावा, असे मॅनेजर कर्मचाऱ्यांना सांगत असल्याचे चॅटमधून स्पष्ट दिसत आहे.

ब्रेकची वेळ वाढवल्याने मॅनेजरने झापले

एका कर्मचाऱ्याने त्याच्या ब्रेकची वेळ 27 मिनिटांनी वाढवल्याने मॅनेजरने त्याला चांगलेच झापले. त्यामुळे त्याने टॉयलेट ब्रेक घेतल्याचे मॅनेजरला सांगितले. त्यावर मॅनेजरने टॉयलेट ब्रेकही 60 मिनिटांच्या मर्यादेतच घ्यायचा अशी तंबी दिली, तर एका कर्मचाऱ्याने 60 मिनिटांच्या ब्रेकमध्ये टॉयलेट ब्रेकसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त ब्रेक मागितला. मात्र हा अतिरिक्त ब्रेक देण्यास मॅनेजरने सरळ नकार दिला. तसेच याविषयी अधिक चर्चा नको असे सांगत संवाद थांबवला.