महाबळेश्वरातील बाजारपेठेत अंधाराचे साम्राज्य; अनेक दिवसांपासून पथदिवे बंद, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर पालिकेचा कारभारी हा सक्षम नसल्याने महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक अडचणींचा सामना करीत असलेल्या या प्रमुख बाजारपेठेतील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, याचा फटका पर्यटकांना बसत आहे.

वर्षा सहलीसाठी देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांनी महाबळेश्वर सध्या गजबजले आहे. या पर्यटकांकडून पालिका प्रवेश कर व प्रदूषण कर गोळा करते. या बदल्यात पालिकेने पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सर्व प्राथमिक सुविधा पुरविणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शहराच्या विविध भागांतील स्ट्रीट लाईट या गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. लिंगमळा ते वेण्णा लेक, वेण्णा लेक ते महाबळेश्वर त्याचप्रमाणे महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील अनेक खांबांवरील पथदिवे गेले अनेक दिवस बंद आहेत. सध्या पावसाळी हंगाम सुरू आहे. अनेक बाजारपेठांत दुकानातील प्रकाशात रस्ता दिसतो.

मात्र, पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरते. अशा रस्त्यांवरून चालताना पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असते. महाबळेश्वर नगरपालिका वीजपुरवठा व त्यांची देखभाल दुरुस्ती यासाठी लाखो रुपये खर्च करीत असते. मग हे लाखो रुपये नेमके कशावर खर्च होतात व ते कोणाच्या खिशात जातात, याविषयी शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेतील तथाकथित नेते हे सुशोभीकरणासाठी आग्रही असतात; पण त्यांच्याच दुकानासमोर असलेल्या विजेच्या खांबावरील दिवे बंद आहेत, हे त्यांना कसे दिसत नाही, याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.