Air India च्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती; तिरुवनंतपुरम विमानतळावर तात्काळ लँडींग, शोध सुरू

मुंबईहून केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळावर आणीबाणीची सूचना जारी करण्यात आली. त्यामुळे तिरुवनंतपुरम येथील विमानतळावर एकच खळबळ उडाली. विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

एअर इंडियाचे फ्लाइट 657 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात एकूण 135 प्रवासी होते. सध्या या विमानाला आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना लवकरच विमानातून बाहेर काढले जाईल. हे विमान आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आल्याने इतर विमानांना कोणताही धोका नाही. सध्या या विमानात बॉम्ब असल्याची माहिती खरी आहे की खोटी याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली असल्याचे समजते. मात्र वैमानिकाला ही माहिती कुठून मिळाली हे अद्याप समजू शकलेले नाही.