टिशू पेपरपासून साकारला एल्फिन्स्टनचा एकदंत

पोईसर येथील मुद्रिका फाऊंडेशनतर्फे या वर्षी बाप्पाची मूर्ती इकोफ्रेंडली साहित्याने बनवण्यात आली आहे. या मूर्तीची खासियत म्हणजे ती विविध रंगांच्या धाग्यांनी तयार केली आहे, जे वेगवेगळ्या धर्मांचा आणि जातींचे प्रतिनिधित्व करतात. याद्वारे विविधतेमधून एकतेचा संदेश दिला आहे.

एल्फिन्स्टनचा एकदंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एल्फिन्स्टन विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 61वे वर्ष आहे. याही वर्षी मंडळाने उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी श्रींची 13 फुटांची मूर्ती चक्क टिशू पेपरपासून साकारली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून पर्यावरणाचे जतन, संरक्षण व त्यातील जिवांचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे हा संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. मंडळाच्या बाप्पाची मूर्ती मूर्तिकार राजेश मयेकर यांनी साकारली आहे. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर खडूचा म्हणजेच पॅल्शियम कार्बोनेटचा थर दिलेला आहे. त्यामागील कारण असे आहे की, पॅल्शियम कार्बोनेटचे पाण्यात विघटन होते व दोन्ही घटक हे समुद्री जिवांसाठी उपयुक्त आहेत. मागील सजावटीत गणराया म्हणजे चैतन्य, आनंद आणि त्याच्या आगमनाने प्रफुल्लित झालेली सृष्टी आणि त्यातील चराचर व त्यांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

एल्फिन्स्टन विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामुळे अनेक घरगुती आणि सार्वजनिक मंडळे यांना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.