
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मार्गिकांवरून जाणारा 125 वर्षांचा एल्फिन्स्टन ब्रिज गुरुवारपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. मुंबईतील सर्वात जुन्या पुलांपैकी एक असलेल्या एलफिस्टन ब्रिजची पुनर्बांधणी केली जाणार असल्यामुळे पुढील दोन वर्षे हा पूल बंद राहणार आहे. मात्र पूल बंद करण्याआधी वाहतूक वळवण्याच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचे योग्य नियोजन केलेले नाही. याबाबत सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक तसेच परळ परिसरातील रुग्णालयांमध्ये राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांचे अतोनात हाल होणार आहेत.
प्रभादेवी आणि परळ परिसराला जोडणाऱ्या एल्फिन्स्टन ब्रिजवरून पूर्वेकडून पश्चिमेकडे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलाची पुनर्बांधणी करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेतले जाणार आहे. तसेच या ब्रिजवरून वरळी-शिवडी एलिव्हेटेड कनेक्टरचे काम केले जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन ब्रिजवर हातोडा मारला जाणार आहे. कामगार वस्तीतील ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार राहिलेला ब्रिज इतिहासजमा होणार आहे. हा पूल बंद करण्याआधी वाहतूक वळवण्यासंबंधी योग्य नियोजन केलेले नाही. अचानक पूल 10 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद केला जात असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र वाहतुकीची संभाव्य काsंडी तसेच नागरिकांचे होणारे हाल विचारात न घेताच पूल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पूल बंदचा निर्णय घेतल्यानंतर वाहतूक पोलिसांनी नागरिकांना 13 एप्रिलपर्यंत वाहतुकीसंबंधी सूचना देण्याचे आवाहन केले आहे.
वाहनचालकांना टिळक ब्रिज व करी रोड पुलाचा वळसा
प्रभादेवी परिसरात मोठय़ा प्रमाणावर कॉर्पोरेट पंपन्याही उभ्या राहिल्या आहेत, तर परळ परिसरात केईएम, टाटा, वाडिया यांसारखी नावाजलेली रुग्णालये आहेत. त्यामुळे प्रभादेवी आणि परळ परिसरात पूर्व आणि पश्चिमेकडून मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. या वाहनांना आता दादरचा टिळक ब्रिज किंवा करी रोड पुलाचा वळसा घालावा लागणार आहे. वाहनांचे वाढते प्रमाण विचार घेता हे दोन्ही ब्रिजदेखील पर्यायी वाहतुकीसाठी कमी पडणार आहेत. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बट्टय़ाबोळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पादचाऱ्यांच्या गैरसोयीचे काय?
प्रभादेवी स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांसाठी एल्फिन्स्टन ब्रिज हा पूर्वेकडे वा पश्चिमेकडे जाण्यासाठी सोयीचा ठरत होता. या पुलाव्यतिरिक्त प्रभादेवी स्थानकात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी पर्यायी ब्रिज नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे प्रवासी तसेच पादचाऱ्यांना मध्य रेल्वे मार्गावरील फुटओव्हर ब्रिजचा आधार घ्यावा लागणार आहे.
दोन वर्षांहून अधिक काळ हाल
एल्फिन्स्टन ब्रिजचे तोडकाम आणि पुनर्बांधणीचे काम दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याचे एमएमआरडीएने जाहीर केले आहे. मात्र शहरातील यापूर्वी पाडकाम केलेल्या पुलांच्या पुनर्बांधणी कामातील विलंब लक्षात घेता एल्फिन्स्टन ब्रिजचे काम पूर्ण होण्यासाठीही दोन वर्षांहून अधिक काळ जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
परळ परिसरात नामांकित शाळा, महाविद्यालये आहेत. सध्या या शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. याच परीक्षांच्या काळात एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतल्यामुळे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत.