एल्फिन्स्टन पूल बंद करण्याची प्रशासनाला घाई, वाहतूक नियोजनाचे पोलिसांपुढे आव्हान

प्रभादेवी रेल्वे स्थानकातील एल्फिन्स्टन पूल 15 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद करण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या यंत्रणांनी केली आहे. मात्र पूल बंद करण्याआधी इथली वाहतूक कुठे वळवावी? संभाव्य वाहतूककोंडी कशी टाळावी? याचे आव्हान वाहतूक पोलिसांपुढे आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी एल्फिन्स्टन पुलाला पर्यायी मार्ग असलेले करी रोड आणि दादरचा टिळक पूल हे दोन्ही पर्यायही अपुरे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी केली जाणार असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण आणि मध्य मुंबईत मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. अनेक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक अन्यत्र वळवताना नेहमीची कोंडी होणार नाही, यादृष्टीने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. त्याचबरोबर प्रभादेवी स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना पूर्वेकडे जाण्यासाठी दुसरा पर्याय उरणार नाही. ही गैरसोय विचारात घेऊन प्रभादेवी स्थानकातील दक्षिणेकडील पादचारी पुलाचे अर्धवट स्थितीतील काम आधी पूर्ण करण्याची गरज आहे. याबाबत प्रशासन कुठलीही ठोस पावले उचलत नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत.

पुलाच्या कामाशी विविध यंत्रणांचा संबंध येत आहे. मात्र या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने पूल बंदची घाई केल्यास प्रवाशी आणि पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडे नागरिकांच्या अनेक सूचना आणि हरकती प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या हरकती आणि पर्यायी मार्गांचा अपुरेपणा यात वाहतुकीचे नियोजन कसे करायचे, याचे आव्हान वाहतूक पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.