
प्रभादेवी रेल्वे स्थानकातील एल्फिन्स्टन पूल पुनर्बांधणीसाठी बंद करण्यावरून सरकारी यंत्रणांमध्ये सावळागोंधळ असल्याचे गुरुवारी उघड झाले. पूल गुरुवारपासून बंद करणार असल्याचे पत्र महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने प्रभादेवी स्थानक अधीक्षकांना दोन दिवसांपूर्वी दिले. प्रत्यक्षात परवानगीचे कागदोपत्री घोडे अडलेले असल्यामुळे पूल बंद झाला नाही. याचदरम्यान पूल बंद असण्याचे गृहीत धरून अनेक प्रवासी व वाहनधारकांनी दादर, करी रोडला वळसा घालण्याचा नाहक मनस्ताप सहन केला.
125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. हे काम करतानाच शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टरसाठी रोड ओव्हर ब्रिजचेही काम करण्यात येणार आहे. यासाठी एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. मात्र येथील वाहतुकीला पर्यायी मार्ग अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यातच पादचाऱ्यांच्या गैरसोयीचाही विचार केलेला नाही. याचवेळी वाहतूक पोलीस, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), रेल्वे, पालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या विविध यंत्रणांत समन्वय नसल्याचे उघड झाले आहे.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने वाहतूक पोलीस आणि एमएमआरडीएसोबत 21 मार्चला घेतलेल्या संयुक्त बैठकीत 10 एप्रिलपासून पूल बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयाची कल्पना पूल उभा असलेल्या प्रभादेवी स्थानकाच्या स्टेशन अधीक्षक कार्यालयाला दोन दिवसांपूर्वीच दिली. प्रत्यक्षात मधल्या काळात 15 एप्रिलपासून पूल बंद करण्याचे ठरवले. त्या निर्णयाबाबतही प्रभादेवी स्थानकाच्या अधीक्षक कार्यालयाला अंधारात ठेवले आहे. यातून सरकारी यंत्रणांतील समन्वयाचा सावळागोंधळ उघड झाला आहे.
पादचारी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची शिवसेनेची मागणी
प्रभादेवी स्थानकातील एल्फिन्स्टन पूल लवकरच पाडण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मात्र या स्थानकाच्या दक्षिणेकडे असलेल्या पादचारी पुलाचे काम कित्येक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत ठेवले आहे. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करून पादचाऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते-खासदार सावंत यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केली.
प्रभादेवीच्या पूर्वेकडील भागात अनेक रुग्णालये आणि महाविद्यालये आहेत. त्यांच्या सोयीसाठी एल्फिन्स्टन पुलाला पर्यायी पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी आम्ही मागील चार-पाच वर्षे करतोय, मात्र सरकार आणि पालिकेचा कारभार भयानक आहे. त्यामुळे पादचारी पुलाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही, असा दावाही खासदार सावंत यांनी यावेळी केला.