शिवसेनेच्या आग्रही मागणीनंतर एल्फिन्स्टन पूल बंदच्या हालचालींना बेक, नागरिकांच्या सूचना-हरकतींचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेणार

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल बंद करण्याच्या हालचालींना ब्रेक लागला आहे. पादचारी व वाहनधारकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच पूल बंद करण्याची आग्रही मागणी शिवसेनेने केली होती. त्यानंतर प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. वाहतूक पोलिस नागरिकांच्या सूचना-हरकतींचा अभ्यास करून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

एल्फिन्स्टन पूल बंद केल्यास दादर, परळ, लालबाग परिसरात वाहतूककाsंडी आणि रुग्णांचीदेखील फरफट होणार आहे. रुग्णवाहिकांना अतिरिक्त चार किमीचा वळसा घालावा लागणार आहे. लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरच एल्फिन्स्टन पूल बंद करण्याची मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे केली होती. तसेच प्रभादेवी स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर एल्फिन्स्टन पूल बंद करण्याची मागणी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती.

शिवसेनेच्या या मागणीनंतर प्रशासनाने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. वाहतूक पोलीस 15 एप्रिलपासून पूल बंद करणार होते. मात्र शिवसेनेच्या पत्रव्यवहारानंतर पूल बंद करण्याच्या हालचालींना ब्रेक लागला आहे.

आधी पादचारी पूल पूर्ण करा! – खासदार अरविंद सावंत

शिवसेनेच्या आग्रही मागणीनंतर वाहतूक पोलिसांनी एल्फिन्स्टन पूल बंदचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. वास्तविक, पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केले पाहिजे. त्याबरोबरच प्रभादेवी रेल्वे स्थानकातील दक्षिणेकडील पादचारी पुलाचे काम आधी पूर्ण केले पाहिजे. या पादचारी पुलाचे काम कित्येक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. रेल्वे प्रवासी, स्थानिक नागरिक तसेच परळ परिसरातील रुग्णालयांत येणाऱया रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी या पुलाचे काम आधी पूर्ण केलेच पाहिजे. त्यानंतर एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.