
अमेरिकन उद्योजक अब्जाधीश आणि ट्रम्प यांच्या सरकारमधील मंत्री एलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कर्नाटक उच्च न्यायालयात हिंदुस्थान सरकारविरोधात खटला दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 79 (3) (ब) चा दुरुपयोग करून एक्सवरील मजकूर केंद्राने ब्लॉक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अशाप्रकारे मजकूर ब्लॉक करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी भूमिका एक्सने मांडली आहे. कायद्यातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून सरकार अवैधरित्या एक्सवर नियंत्रण आणू पाहत असल्याचा आरोप करत याप्रकरणी एक्सने तीव्र चिंताही व्यक्त केली आहे.
एक्सची नेमकी भूमिका काय?
- माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 79 (3) (ब) अंतर्गत सरकारला मजकूर ब्लॉक करण्याचा अधिकार नाही. मात्र केंद्र सरकार कलम 69 अ ऐवजी या कलमाचा वापर करत आहे.
- सहयोग नावाच्या पोर्टलच्या माध्यमातून मजकूर ब्लॉक करण्यासाठी सरकारने समांतर आणि अवैध प्रणाली तयार केली आहे. मात्र कोणताही कायदा एक्सला सहयोग पोर्टलमध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडू शकत नाही.