>> जीवन मुळे
सध्या हिंदुस्थानात आत्मनिर्भरतेचे वारे जोरात वाहत आहेत. प्रत्येक जण, विशेषत तरुण पिढी याबाबत अधिक सजग झालेली दिसते. त्यांना हेही कळून चुकले आहे की, नोकरीच्या मृगजळामागे धावण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा उद्योजकतेच्या मार्गावर वाटचाल करणे अधिक श्रेयस्कर आहे. जीवनात यशस्वी उद्योजक होण्यासाठी नव्या पिढीला उद्योजकतेबाबतची काळाच्या कसोटीवर पारखलेली सिद्ध तत्त्वे आणि कार्यपद्धती (proven principles and methods) जाणून घेण्यात विशेष स्वारस्य आहे. प्रस्थापित उद्योग-व्यावसायिकांनाही या ज्ञान-कौशल्याची व्यवसाय विकासासाठी आवश्यकता आहे. अनेक बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक आणि उद्योजक रँडी कर्क यांनी लिहिलेले आणि सुनीति काणे यांनी अनुवादित केलेले ‘एलॉन मस्क’ हे पुस्तक यादृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे. आपल्या व्यवसायात यशस्वी होण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो; कारण या पुस्तकात जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क याच्या अनुभवसिद्ध कार्यपद्धतींची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.
स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचा संस्थापक एलॉन मस्क याचे नाव आज सर्वांना परिचयाचे झाले आहे. कारण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान त्याला नव्या वर्षात प्राप्त झाला आहे, परंतु ‘आजच्या जगातील सर्वात प्रभावशाली द्रष्टा उद्योजक’ हीच त्याची खरी ओळख आहे. एलॉन मस्कचे तंत्रज्ञानावरचे निरतिशय प्रेम, त्याच्या साहाय्याने माणसाला प्रगतीच्या नव्या वाटांचा मार्ग शोधण्यास दिशा देणारे मस्कचे व्यवसाय, गुणवत्तेची पारख करून संधी देण्याचे त्याचे कौशल्य अशा नेमक्या मुद्यांसह उद्योजकतेचे धडे शिकत वाचकांना एलॉनची कार्यपद्धती समजून घेता येते.
पुस्तकामध्ये यशस्वी उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असणारी आणि एलॉन मस्क याने प्रत्यक्षात उपयोगात आणलेली सोळा गुण-तत्त्वे विस्ताराने समजावून सांगितली आहेत. जिज्ञासा (कुतूहल), चिकाटी, सर्जनशीलता, विश्लेषण क्षमता, आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग, नेतृत्व गुण, जोखीम घेण्याची पात्रता, गुणवत्तेचा आग्रह, सुधारणा सातत्य इत्यादी गुण-क्षमता प्रत्येक उद्योजकाने मिळवायला हव्यात, असे मस्क याचे प्रामाणिक मत आहे. मस्क याने याबाबत विविध प्रसंगी सांगितलेले महत्त्वपूर्ण स्वानुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. यशापयशाविषयी त्याच्या धारणा सुस्पष्ट आहेत. ‘प्रत्येक अपयश मला धडा शिकवून गेले आणि असे धडे शिकल्यावाचून यश मिळाले नसते.’ या वाक्यातून मस्कची वैचारिक बैठक आणि यशस्वितेच्या संकल्पना किती प्रगल्भ आहेत याची प्रचिती येते.
‘शून्यातून स्वर्ग निर्माण करणे’ म्हणजे काय असते हे त्याच्या दैदीप्यमान उद्योजकीय कामगिरीवरून लक्षात येते. एलॉनच्या म्हणण्यानुसार कुतूहल, प्रचंड वाचन आणि प्रत्येक आठवड्यात 100 तास काम करणे या गोष्टींमुळे त्याला हे यश मिळाले आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला मस्क याच्या वैयक्तिक जडणघडणीबाबतही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या कार्यशैलीचा, मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याच्या जिद्दी वृत्तीचा परिचय वाचकांना होतो.
एलॉन हा धडाडीचा उद्योजक म्हणून ओळखला जातो. त्याचे व्यक्तिमत्त्व तरुणांना आकर्षित करणारे आहे. सातत्याने नवनवीन उद्दिष्टांच्या शोधात असलेल्या एलॉनला माणसे जोडण्याची कला उत्तम अवगत आहे. कदाचित म्हणूनच त्याच्याविषयी प्रत्येकालाच अधिक जाणून घ्यायचे असते.
समर्पक उदाहरणासह अत्यंत सोप्या भाषेत, ओघवत्या शैलीतील अभ्यासपूर्वक लिहिलेल्या या पुस्तकाचे नव-उद्योजकासह सर्वांकडून स्वागत होईल, अनुभवसिद्ध कार्यपद्धती संबंधितांच्या व्यवसायात रुजवण्याची प्राक्रिया होईल असा विश्वास वाटतो.
एलॉन मस्क
प्रकाशक : साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
लेखक : रँडी कर्क
अनुवाद : सुनीती काणे
मूल्य : 250 रुपये