हिंदुस्थानने एका दिवसात तब्बल 64 कोटी मते कशी मोजली, असा सवाल टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानच्या निवडणूक प्रक्रियेचे त्यांनी कौतुकही केले आहे. एक्सवरून मस्क यांनी एका एक्स युजरच्या पोस्टचा हवाला देत हिंदुस्थानातील निवडणूक पद्धतीवर भाष्य केले आहे. कॅलिफोर्निया 18 दिवसांपासून 15 दशलक्ष मते मोजत आहे. परंतु, हिंदुस्थानने एका दिवसात तब्बल 640 दशलक्ष मते मोजली असे या युजरने म्हटले होते. त्याची पोस्ट मस्क यांनी शेअर केली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 5 नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. तर हिंदुस्थानात 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकांसह 13 राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांची आणि एका लोकसभा पोटनिवडणुकीतील मतांची मोजणी झाली.
बॅलेट पेपरमुळे मोजणीला लागतोय वेळ
अमेरिकेत बहुतेक मतदान कागदी मतपत्रिका किंवा ई-मेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ 5 टक्के मतदानासाठी मशीनचा वापर करण्यात आला. अशा स्थितीत मोजणीला बराच वेळ लागतो. कॅलिफोर्निया अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य असून तेथे 3.9 कोटी लोक राहातात. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 1.6 कोटी लोकांनी मतदान केले होते. मतदानाला दोन आठवडे उलटले तरी अद्याप सुमारे 3 लाख मतांची मोजणी व्हायची आहे. अमेरिकेत दरवर्षी मतमोजणी व्हायला आठवडा लागतो.