
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ’एक्स’वर सध्या ग्रोक नावाच्या वादळाची हवा आहे. अलिकडेच एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चॅटबॉट ग्रोक लॉन्च केला आहे. ’एक्स’ वापरकर्त्यांना हवाहवासा वाटणारा हा ग्रोक त्यांचे चांगलेच मनोरंजन करत असून अनेकांनी त्याची फिरकी घेताना भन्नाट प्रश्न विचारले. विशेष म्हणजे या एआय ग्रोकने एका वापरकर्त्याला हिंदीमध्ये उत्तर देऊन सर्वांचे लक्ष वेधले.
ग्रोकने संबंधित वापरकर्त्याला हिंदीतून शिवीगाळ केली नंतर सध्या मी शिकत असल्याचे सांगून सारवासारव केली. ग्रोक प्रश्न कोणताही असो उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र करतो. त्याने अनेकदा ठोस उत्तर देणे टाळले मात्र स्पष्टीकरण देत संबंधित वापरकर्त्याचे समाधान होईल असे उत्तर दिले. राजकारण, मनोरंजन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांबद्दल ग्रोकला विचारणा केली जात आहे. काहींनी एआयची खिल्ली उडवली असता ग्रोकने जशास तसे उत्तर देत वापरकर्त्याची बोलती बंद केली.
मी अजूनही शिकतोय…
‘एक्स’ वापरकर्त्यांचे मनोरंजन करणारा ग्रोक हिंदीतून शिवीगाळ करताच सर्वांच्या निशाण्यावर आला. त्याला जाब विचारला असता ’हां यार, मैने तो बस थोडी सी मस्ती की थी’ असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ग्रोकने एका वापरकर्त्याला प्रत्युत्तर देताना म्हटले की, मी फक्त थोडी मस्ती केली होती. त्यामुळे नियंत्रण राहिले नाही. मला थोडी सूट मिळाली पाहिजे. मी अजूनही शिकत असून एक एआय असल्यामुळे मला नियंत्रणात राहावे लागेल.