डोनाल्ड ट्रम्प यांना एलन मस्कचे पाठबळ! निवडणूक प्रचारासाठी देणार 376 कोटींची देणगी

रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक बड्या हस्तींचा पाठींबा मिळत आहे. अमेरिकेसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क हे ट्रम्प यांना पाठिंबा देणार आहेत. दरम्यान मस्क ट्रम्प यांना केवळ पाठिंबाच देणार नसून त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी आर्थिक सहाय्य देखील करणार आहेत.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले आहे. मस्क आता दर महिन्याला $45 दशलक्ष इतकी मोठी देणगी ट्रम्प यांना प्रचारासाठी देणार आहेत. $45 दशलक्ष म्हणजेच भारतीय चलनानुसार याची किंमत 376 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे.

अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. गेल्या आठवड्यात एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती, त्यात ते थोडक्यात बचावले होते. मात्र या प्राणघातक हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी चांगलीच भक्कम झाली.

दरम्यान, हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवारी रात्री मिल्वॉकी शहरात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांना 2387 प्रतिनिधींची मते मिळाली. उमेदवार निवडण्यासाठी 1215 मतांची आवश्यकता आहे. त्यानंतर पक्षाने ट्रम्प यांचे नाव राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. उपराष्ट्राध्यक्षपदासाठी 39 वर्षीय जेम्स डेव्हिड व्हॅन्स यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.