अदानीकडून बसवण्यात येणाऱया स्मार्ट प्रिपेड मीटरमुळे वीजबिलात भरमसाट वाढ होणार असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्याचबरोबर वीज वितरण कंपन्यांचे हजारो कामगार बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे अदानीचा हा स्मार्ट प्रिपेड मीटर एकजुटीने हाणून पाडूया, असे आवाहन विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीने केली आहे.
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने सर्व विद्यमान वीज मीटर्स बदलून त्या जागी 2 कोटी 25 लाख 65 हजार स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 27 हजार कोटी येणार आहेत. हे स्मार्ट मीटरचा पुरवठा करणे आणि ती बसवण्याचे कंत्राट अदानीला या आधीच देण्यात आले आहे. अदानी पुढील 8 ते 10 वर्षे हे मीटर चालवणे, त्यांची देखभाल करणे, ग्राहकांकडून पैसे गोळा करणे, तक्रारींची दखल घेणे, वीज पुरवठा खंडित करणे आणि पूर्ववत करणे ही कामे केली जाणार आहेत. हा प्रकल्प हाणून पाडण्यासाठी विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीच्या वतीने जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड, हर्षद स्वार, गिरीश आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
देशातील अन्य भागात बसवलेल्या मीटरच्या अनेक तक्रारी असून त्यापैकी मीटर रीडिंग अधिक येत असल्याच्या तक्रारी आहे.
पैसे आधीच भरावे लागत असल्यामुळे येणाऱया बिलावर ग्राहकांचे कोणतेही नियंत्रण नसेल.
वीज भरण्याची मुदत संपल्यास 20 दिवसांचा वाढीव कालावधी मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होईल.
मीटरची किंमत ग्राहकांच्या वीज बिलातून वसूल केली जाईल.
दिवसा कमी तर आणि रात्री जास्त दर ठेवल्यामुळे वीज बिलात वाढ होणार आहे.
स्मार्ट मीटरमुळे जी कामे वितरण पंपनीतील कर्मचारी करताना ती करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे या कर्मचाऱयांवर बेकारीची कुऱहाड कोसळेल.