शाळेत चक्कर येऊन कोसळल्याने सहावीच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. दिव्या प्रितेश त्रिपाठी (११) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उंटवाडीजवळील जगतापनगर येथे राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये दिव्या त्रिपाठी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. दिव्या नाशिकमधील उपेंद्रनगर येथील रुद्र इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकत होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे दिव्या शाळेत गेली. शाळेत सकाळी आठच्या सुमारास अचानक दिव्याला चक्कर आली आणि ती बेंचवरुन खाली कोसळली.
शिक्षकांनी दिव्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच तिच्या पालकांनाही याबाबत माहिती देण्यात आली. मात्र उपचारापूर्वीच दिव्याचा मृत्यू झाला. दिव्याला चक्कर कशामुळे आली याबाबत नेमके कारण समजू शकले नाही. अंबड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.