
पेणमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून दाम्पत्य जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. प्राईड सिटी या सात मजली इमारतीमध्ये हा अपघात झाला असून त्यात राजन शिंदे व शीतल शिंदे हे दोघे जखमी झाले आहेत. त्या दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही लिफ्ट धोकादायक झाल्याच्या तक्रारी वारंवार करूनही बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
प्राईड सिटी इमारतीमधील रहिवाशांनी सातव्या मजल्यावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्नेहभोजन केल्यानंतर शिंदे दाम्पत्य सातव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढले. मात्र लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर येताच तांत्रिक बिघाड झाला आणि लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेनंतर रहिवाशांनी बिल्डरविरोधात संताप व्यक्त केला आहे. बिल्डरने लवकरात लवकर लिफ्ट बदलून द्यावी व जखमींना भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
रहिवाशांचा बिल्डरविरोधात संताप
अनेक वर्षांपासून लिफ्टची ऑडिट झालेली नाही. ही लिफ्ट निष्कृष्ट झाल्याची तक्रार रहिवाशांनी बिल्डरकडे वारंवार केली आहे. तरीही बिल्डर त्यांच्या तक्रारींकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. बिल्डरने वेळीच इमारतीच्या लिफ्टकडे लक्ष दिले असते तर हा अपघात झालाच नसता, असा संताप रहिवाशांनी केला आहे.