
राज्यातील निर्मिती, पारेषण आणि वितरण या तीनही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र पीएफ ट्रस्ट वादात सापडला आहे. महिनाअखेर पगारापोटी कपात होणारी पीएफची रक्कम आरपीएफसीच्या नियमात बसणाऱ्या सक्षम वित्तीय संस्थेत न गुंतवल्याने या ट्रस्टला जवळपास दोन हजार कोटींचा तोटा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भ्रष्ट विश्वस्तांच्या मनमानी कारभारामुळे 90 हजार वीज कामगारांची कुटुंबे देशोधडीला लागणार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटकने केला आहे. वीज कामगारांच्या कुटुंबीयांना उघड्यावर आणणाऱ्या भ्रष्ट वीज प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (आरपी एफसी) गुंतवणुकीसंदर्भात काही नियम घालून दिले आहेत. मात्र काही वित्तीय संस्था या नियमांकडे दुर्लक्ष करतात. असाच प्रकार वीज कर्मचाऱ्यांच्या पीएफसंदर्भात झाला आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची भविष्याची ठेव जाणीवपूर्वक ट्रस्टच्या विश्वस्तांनी या कंपन्यांमध्ये गुंतवली आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांचा 13 हजार कोटींचा पीएफ धोक्यात आला आहे. ट्रस्टच्या विश्वस्तांनी 2109 पासून वार्षिक ताळेबंद अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. शिवाय माहिती अधिकारातही गुंतवणुकीसंदर्भातील कागदपत्रे दिली जात नाहीत. ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार झाला असून संबंधित विश्वस्तांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी येणाऱ्या अधिवेशनात केली जाणार असल्याची माहिती वीज कामगार फेडरेशनच्या वतीने आमदार भाई जगताप यांनी दिली.
कर्मचाऱ्यांमध्ये घबराट; कुटुंबेही धास्तावली
आयएल अॅण्ड एफएस रिलायन्स कॅपिटल आणि डीएचएफएल या वित्तीय संस्था बुडीत निघाल्यामुळे वीज मंडळाने या संस्थांमध्ये गुंतवलेले सुमारे 570 कोटी रुपयांच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे हे पैसे बुडण्याच्या मार्गावर असल्याने त्यांच्यात घबराट पसरली असून कुटुंबेही धास्तावली आहेत. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे
या वित्तीय संस्था बुडीत
आरपीएफसीच्या नियमानुसार गुंतवणुकीच्या अटी व शर्ती पूर्ण करीत नसतानाही वीज कंपन्यांच्या ट्रस्टकडून आयएल अॅण्ड एफएस रिलायन्स कॅपिटल व डीएचएफल या वित्तीय संस्थांमध्ये ५६९.४४ कोटी रुपये गुंतवण्यात आले होते. मात्र या तिन्ही वित्तीय संस्था बुडीत निघाल्याने ती रक्कम आणि त्यावरील व्याज आता बुडीत निघाले आहे. या कंपन्याही आता दुसऱ्या कंपन्यांमध्ये विलीन झाल्या आहेत. त्याशिवाय सरदार सरोवरकडून ४६ कोटी व मध्य प्रदेश इलेक्ट्रीसिटी बोर्डकडून १२ कोटी रुपये व्याजासहित येणे आहे. यामुळे दिवसेंदिवस ट्रस्ट तोट्यात जात आहे. त्यामुळे त्वरित ट्रस्ट बरखास्त करून ईपीएफओला हस्तांतरित करावा आणि संबंधित विश्वस्तांवर गुन्हा दाखल करून तोट्याची रक्कम वसूल करावी अशी मागणीही भाई जगताप यांनी केली आहे.