महायुतीला राक्षसी बहुमत मिळेल असे चित्र नव्हतेच! ऍड. असीम सरोदे यांचा दावा; पराभूत उमेदवारांतर्फे याचिका दाखल करणार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर गंभीर शंका उपस्थित केली जात आहे. कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी निवडणूक निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. राज्यात महायुतीला राक्षसी बहुमत मिळेल असे चित्र नव्हतेच, असा दावा करीत अॅड. सरोदे यांनी पराभूत उमेदवारांतर्फे कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले.

शनिवारी जाहीर झालेला विधानसभा निवडणुकीचा निकाल अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. महायुतीला राक्षसी बहुमत मिळण्यासारखे चित्र महाराष्ट्र नव्हते. असे असताना महायुतीला बहुमत मिळाले. त्यामुळे शंकेचे वातावरण आहे. मी ज्या उमेदवाराला मत दिले, ते मत त्या उमेदवारापर्यंत पोहोचल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होते. सध्या आपण कुणाला मतदान करतोय व ते मत कुणाला जातेय, यावर लोक संशय घेत आहेत. तांत्रिक बाजूमुळे अनेक गोष्टी सिद्ध होत नाहीत. याचा गैरफायदा राजकीय पक्षांनी घाऊक पद्धतीने घ्यायचा व कुठलीही लाट नसताना बहुमत मिळवायचे, अशी स्थिती आहे. याबाबत विविध शंकांना वाट करून देण्यासाठी अनेकांनी न्यायालयात जायचा निर्णय घेतला आहे, असे अॅड. सरोदे यांनी सांगितले.

सामान्य नागरिकही दाद मागू शकतात

कोर्टात दाद मागण्यासाठी अनेक पराभूत उमेदवारांनी मला संपर्क केला. प्रत्येकाचे आक्षेप पाहून स्वतंत्र याचिका दाखल करू. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल करावी. याबाबत केवळ उमेदवार नव्हे तर सामान्य मतदारही निवडणूक प्रक्रियेला आव्हान देऊ शकतो, असे अॅड. सरोदे म्हणाले.