दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज ; 2 लाख 91 हजार 297 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

दापोली विधानसभा मतदारसंघात 2 लाख 91 हजार 297 मतदार असून मंगळवारी दुपारीच 392 मतदान केंद्रावर मतदान पथके पोहचली .यामध्ये मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 1 पोलीस कर्मचारी, 1 होमगार्ड, अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली असून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त असलेल्या हेल्पडेस्क सोबत स्वयंसेवक यांची नियुक्ती केली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा असतील. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेष्ठ नागरीकांसाठी थेट प्रवेश असणार आहे.

दापोली मतदारसंघात दापोली या तालुक्यासह मंडणगड तालुका तसेच काही खेड तालुक्याचा भाग समाविष्ट आहे. अशा दापोली विधानसभा मतदारसंघातील 392 मतदान केंद्रावर 2 लाख 91 हजार 297 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संघाची विभागणी एकूण 60 झोन मध्ये केलेली आहे. प्रत्येक झोन साठी साधारणता 5 ते 7 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक झोनसाठी एक झोनल ऑफिसर, एक झोनल पोलीस ऑफिसर आणि एक राखीव अधिकारी देण्यात आलेले आहेत. मतदान केंद्रावर इलेट्रॉनीक व्होटींग मशीन मध्ये बिघाड झाल्यास राखीव बदली मशीन झोनल अधिकारी यांचेकडे देण्यात आले आहेत.

मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तसेच मतदान केंद्रावरील समस्या दूर करण्यासाठी मध्यवर्ती कंट्रोल रुम स्थापन करण्यात आली आहेत. मतदानाची दोन तासाची आकडेवाडी गोळा करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. बुधवारी 20 नोव्हेंबर ला सकाळी 7 ते सायं 6 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदाराला आपल्या सोबत मतदान केंद्रात मोबाईल घेवून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मतदार कक्षात मतदान करताना छायाचित्रे काढल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. आदर्श आचार संहिता पालन करण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व इव्हीएम मशीन या दापोली शहरातील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहाच्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत. शनिवारी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.