राज्यातील 87 मतदारसंघांवर आयोगाचा वॉच, निवडणूक खर्चावर नियंत्रण; अतिरिक्त पथके नेमण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

लोकसभा निवडणुकीत वारेमाप खर्च आणि गैरव्यहार समोर आलेले 87 मतदारसंघ केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. या मतदारसंघांतील खर्चावर निवडणूक आयोगाचा वॉच असणार आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या तैनात करण्यात आलेल्या पथकांव्यतिरिक्त आणखी भरारी पथके नेमण्याचे निर्देश संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पथकांमध्ये राज्याच्या पोलीस विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पेंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचे अधिकारी किंवा कर्मचारी नेमावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील 87 विधानसभा क्षेत्रामध्ये आचारसंहितेच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू मोठ्या प्रमाणात आढळून आल्या होत्या. तसेच उमेदवारांच्या खर्चाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने हे मतदारसंघ संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत.

खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ

नंदुरबार ः अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर; धुळे ः साक्री, धुळे शहर, शिरपूर; जळगाव ः चोपडा, जळगाव शहर, रावेर; बुलढाणा ः मलकापूर, चिखली, बुलढाणा; अकोला ः अकोला पश्चिम; अमरावती ः बडनेरा; वर्धा ः वर्धा; नागपूर ः हिंगणा, नागपूर पूर्व, नागपूर मध्य; भंडारा ः भंडारा; गोंदिया ः गोंदिया, गडचिरोली ः गडचिरोली; चंद्रपूर ः चंद्रपूर, बल्लारपूर; यवतमाळ ः यवतमाळ, आर्णी; नांदेड ः किनवट, भोकर, देगलूर; परभणी ः जिंतूर, परभणी; जालना ः जालना; छत्रपती संभाजीनगर ः फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर मध्य, गंगापूर; नाशिक ः बागलाण, कळवण, दिंडोरी, नाशिक मध्य, इगतपुरी; पालघर ः पालघर, डहाणू, वसई; ठाणे ः भिवंडी पूर्व, मुरबाड, उल्हासनगर, डोंबिवली, ओवळा माजिवडा, ठाणे, ऐरोली, बेलापूर; मुंबई उपनगर ः वांद्रे पूर्व, कुर्ला, भांडुप पश्चिम; मुंबई शहर ः माहीम, मुंबादेवी, कुलाबा; रायगड ः पनवेल, कर्जत, उरण; पुणे ः खेड, आळंदी, शिरूर, दौंड, बारामती, मावळ, चिंचवड, पिंपरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट; अहिल्यानगर ः संगमनेर, नगर शहर; बीड ः बीड, आष्टी, लातूर ः निलंगा, औसा; धाराशीव ः उमरगा; सोलापूर ः सोलापूर शहर उत्तर, माळशिरस; सिंधुदुर्ग ः सावंतवाडी, कणकवली; कोल्हापूर ः चंदगड, कोल्हापूर उत्तर, शिरोळ; सांगली ः सांगली.

गुजरात पासिंगच्या गाड्या महाराष्ट्रात, साताऱ्यात लाखोंची रोकड पकडली

तीन-चार दिवसांपूर्वी खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका गाडीत पाच कोटी रुपये मिळून आले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुणे-बंगळुरू महामार्गावर नाकाबंदी दरम्यान सातारा जिह्यातील तासवडे-कराड टोल नाक्यावर गुजरात पासिंगच्या महिंद्रा बोलेरो (जीजे 27 ईई 8738) या वाहनाची तपासणी करताना गाडीत 15 लाखांची रोकड सापडल्याने एकच खळवळ उडाली आहे.

राज्यांच्या सीमेलगत असलेले मतदारसंघदेखील संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांत नाक्यांवर ठिकठिकाणी पथके तयार करून तपास सुरू आहे.