दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना आता निवडणूक आयोगाने एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेजिलन्सच्या वापरावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी एक नवा नियम आणला आहे. एआयचा वापर करून बनवलेले फोटो, व्हिडीओ आणि इतर प्रचार साहित्यांवर एआय जनरेटेड असा स्पष्ट उल्लेख करावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना पत्र लिहिले आहे.
निवडणूक प्रचारात एआयचा वाढता वापर लक्षात घेता आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. एकमेकांवर टीकाटिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना सोशल मीडियाचा अतिशय प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. यात एआयच्या माध्यमातून प्रचारात आणखी रंग भरले जात आहेत, असे निवडणूक आयोगाचे निरीक्षण आहे. प्रचारादरम्यान मोठय़ा प्रमाणावर होत असलेला एआयचा वापर लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याबाबत नियम आणल्याचे स्पष्ट केले आहे.
एआयचा जबाबदारीने वापर करा
पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान एआयचा अतिशय जबाबदारीने वापर करावा. जेणेकरून पारदर्शक वातावरणात आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय निवडणूक प्रक्रिया पार पडेल, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.
डीप फेकपासून दूर राहण्याचे होते निर्देश
2024च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना डीप फेक आणि एआयच्या वापरापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता आयोगाकडून एआयच्या वापराबाबत नवी सूचना जारी करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एआयचा वापर करून तयार करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ यांचा मतदारांवर प्रभाव पडतो. त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर समाजमाध्यमांवर अशा पोस्ट शेअर करताना त्यावर एआय जनरेटेड असा स्पष्ट उल्लेख करावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.