शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाबाबत शिवसेनेने मनसेविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. त्या तक्रारीची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल चोवीस तासांत सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने मुंबई शहराच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यासाठी मनसेला मुंबई महानगरपालिकेकडून नियमबाह्य परवानगी देऊन निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले गेले. शिवसेनेने त्यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे गुरुवारी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. शिवसेना नेते, खासदार व पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची यासंदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तरीही महापालिकेने नियम धाब्यावर बसवून शिवाजी पार्कच्या सार्वजनिक मैदानावर दीपोत्सव साजरा करण्याची परवानगी मनसेला दिली. दीपोत्सवाच्या ठिकाणी मनसेने सर्वत्र बॅनर, गेट आणि कंदील लावले आहेत. आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे असे विद्रुपीकरण करणे हा नियमभंग आहे, असे शिवसेनेने निवेदनात नमूद केले होते.
या दीपोत्सवाच्या उद्घाटनावेळी माहीम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या कार्यक्रमाच्या संपूर्ण खर्चाचा अंतर्भात अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात करण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले होते. आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर राजकीय पक्षाच्या प्रचाराला बेकायदेशीर परवानगी दिल्याबद्दल महापालिका व अन्य संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली होती.
दीपोत्सवाच्या ठिकाणी मनसेने सर्वत्र बॅनर, गेट आणि कंदील लावले आहेत. आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे असे विद्रुपीकरण करणे हा नियमभंग आहे, असे शिवसेनेने निवेदनात नमूद केले होते. याची गंभीर दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला आहे.