संध्याकाळी 6 नंतरच्या मतदानाचे प्रतिज्ञापत्र देण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ

विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचा तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्यास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र या मुदतीत आयोगाने हे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही.

ही बाब अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी न्या. अजय गडकरी व न्या. शाम चांडक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. यावर 18 मार्च 2025 रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर केले नाही तरी न्यायालयाने आमचा युक्तिवाद ऐकावा, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. ते न्यायालयाने मान्य केले. आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर केले नाही तरी तुम्ही युक्तिवादाला तयार रहा, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

निवडणूक रद्द करा

मतदान व मतमोजणीत तफावत आल्यास निवडणूक अधिकाऱ्याने त्याची माहिती आयोगाला कळवायला हवी. आयोगाच्या परवानगीशिवाय निकाल जाहीर करू नये, असा नियम आहे. या नियमाचे पालन झालेले नाही. ही निवडणूकच बेकायदा ठरवून रद्द करावी, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

काय आहे प्रकरण

अ‍ॅड. संदेश मोरे यांनी ही याचिका केली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर कशा प्रकारे मतदान घ्यावे यासाठी नियमावली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर येणाऱ्या मतदाराला टोकन नंबर द्यायला हवा. त्याची नोंद करून ठेवावी, असा नियम आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचा तपशील आम्ही आयोगाकडे मागितला. अशी कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे आयोगाने सांगितले. हा तपशील जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.