निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू, आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त गुरुवारी मुंबईत; शनिवारी महत्त्वाची पत्रकार परिषद

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार येत्या गुरुवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आढावा घेतल्यानंतर शनिवारी राजीव कुमार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी राज्यात विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार व आचारसंहिता कधीपासून लागणार हे स्पष्ट होऊ शकते.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव पुमार आणि आयोगाचे दोन अन्य आयुक्त अशी तीन जणांची टीम 26 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील त्याशिवाय निवडणुकीशी संबंधित केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. एक दिवस प्रशासकीय तयारीचा आढावा घेतील. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. त्यानंतर शनिवारी राजीव कुमार पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणूक ईव्हीएम मशीनवर होणार असल्या तरी निवडणुकीसाठी विविध प्रकारचे फॉर्म लागतात. मतदानाशी संबंधित सर्व काम अतिशय संवेदनशील आणि गोपनीय असतात. त्यामुळे ही फॉर्म छपाईची  कामे शासकीय मुद्रणालयात होतात. चर्नी रोड स्थानकाच्या पूर्वेला बाहेर शासकीय मुद्रणालय आहे. या मुद्रणालयात अगदी विधिमंडळाच्या अधिवेशनातील प्रश्नोत्तरापासून शासकीय प्रस्तावांची छपाई होते.

अर्ज छपाईची ऑर्डर दिली

निवडणुकीच्या विविध प्रकाराच्या छपाईचे काम चर्नी रोडच्या शासकीय मुद्रणालयात करण्याचा प्रस्ताव होता. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे फॉर्म या मुद्रणालयात करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या उमेदवारी मागे घेण्याचे अर्ज, निवडणूक प्रतिनिधीच्या नियुक्तीचा अर्ज, इलेक्शन डय़ुटी प्रमाणपत्र, बॅलेट पेपर अकाऊंट आणि मतमोजणीची आकडेवारीचा अर्ज, मतमोजणी प्रतिनिधी, दररोजच्या खर्चाचा तपशील ठेवणारे रजिस्टर, उमेदवारांना दिली जाणारी माहितीपत्रके आणि सूचना, उमेदवाराच्या सहीचा नमुना असलेले पेपर यांची छपाई होणार आहे.