
विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला देण्यात आलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हाशी चित्र आणि नामसाधर्म्य असणारी पिपाणी आणि तुतारी ही चिन्हे गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. याबाबत पक्षाकडून मागणी करण्यात आली होती.
शिवसेना राज्यस्तरीय पक्ष
महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा समावेश करण्यात आला आहे. या पक्षाचे चिन्ह ‘मशाल’ असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
अजित पवार गटाला धक्का; पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला
अजित पवार यांच्या नेतृत्वातील नॅशनलिस्ट कॉँग्रेस पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्षांच्या यादीऐवजी महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत एनसीपीचा समावेश करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
आप राष्ट्रीय पक्ष
आम आदमी पक्षाचा राज्यस्तरीय पक्षांच्या यादीऐवजी राष्ट्रीय पक्षांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचा समावेश राष्ट्रीय पक्षांऐवजी इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांच्या यादीत करण्यात आला आहे.