
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाने बँक खाते उघडण्यास अनुमती आणि कलम 29ब-नुसार देणगी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. गेल्याच आठवडय़ात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अशीच परवानगी देण्यात आली आहे.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मशाल या चिन्हावर निवडणुका लढविण्यात आल्या. महाराष्ट्रात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या निवडणुकांतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लोकप्रतिनिधी कायदा, 1951अंतर्गत राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी. तसेच बँक खाते उघडण्यास अनुमती देऊन पक्षाच्या नावे देणगी स्वीकारण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव पुमार यांची भेट घेऊन केली होती. ही मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
मशाल चिन्हाबाबत स्पष्टता आणणार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मशाल हे निवडणूक चिन्हे निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. मशाला चिन्हाशी साधर्म्य असणारी अन्य काही चिन्ह मतपत्रिकेवर असल्याने मतदारांचा गोंधळ उडत असल्याचे लोकसभा निवडणुकी दरम्यान निदर्शनास आले आहे. त्यामुळे मशाल चिन्हाबाबत अधिक स्पष्टता यावी अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आयोग निश्चितच याबाबत विचार करेल, असे सांगितले.