
महाराष्ट्राच्या सचिवालयातील माजी कर्मचारी असलेल्या दिओजेरॉन नाझरेथ आणि त्यांची पत्नी फ्लाविआना यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. नाझरेथ यांना सायबर चोरट्यांनी क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 50 लाखांना गंडवलं. चोरट्यांनी आयुष्यभराची सर्व जमापुंजी चोरल्याने व भविष्यात कुणावरही अवलंबून राहू लागू नये म्हणून नाझरेथ दाम्पत्याने आत्महत्या केली.
दिओजेरॉन नाझरेथ (82) आणि फ्लाविआना (78) हे दोघे कर्नाटकातील बेळगावमध्ये राहत होते. त्या दोघांना मूलबाळ नव्हते. नाझरेथ यांनी मृत्यूपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली असून त्यात त्यांनी सुमित बिर्रा आणि अनिल यादव यांची नावं लिहली आहेत.
सुमित बिर्रा याने एकेदिवशी तो टेलिकॉम अधिकारी असल्याचे सांगून नाझरेथ यांना फोन केला. ‘तुमच्या नावाने एक सिमकार्ड घेण्यात आले असून त्यावरून खोट्या जाहीराती दिल्या जात आहेत. तसेच लोकांचा मानसिक छळही होत असल्याचे त्याने नाझरेथ यांना सांगितले. त्यानंतर त्याने तो फोन क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून अनिल यादवकडे दिला. अनिल यादवने नाझरेथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नाझरेथ दाम्पत्य घाबरले. त्याचाच फायदा घेऊन त्या दोघांनी यांच्याकडून 50 लाख उकळले. मात्र इतके पैसे देऊनही ते दोघे शांत बसले नाहीत. त्यांनी पुन्हा नाझरेथ दाम्पत्याकडे पैसे मागितले.
सुमित बिर्रा आणि अनिल यादव यांचा छळ संपत नसल्याने तसेच आयुष्यभराची जमापुंजी संपल्याने नाझरेथ दाम्पत्याने आत्महत्या करण्याचे ठऱवले. फ्लाविआना यांनी विष पिऊन आत्महत्या केली तर दिओजेरॉन नाझरेथ यांनी स्वत:चा गळा चिरला. या प्रकरणी पोलिसांनी सुमित बिर्रा आणि अनिल यादव या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.