मुख्यमंत्रीपदावरुन शिंदे-फडणवीसांमधील धुसफूस कॅमेऱ्यात कैद; एकमेकांकडे बघणंही टाळलं!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून दिल्लीतील भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे भाजपकडूनही यावर दावा केला जात आहे. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. याचाच प्रत्यय मंगळवारी सकाळी मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली करण्याच्या शासकीय कार्यक्रमात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे व फडणवीस एकत्र आले होते. यावेळी शिदेंच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. त्यांचा चेहराही उतरलेला होता. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बघणेही टाळले. प्रोटोकॉल म्हणून एकमेकांना नमस्कार केला. यावेळी शिंदेंचेही खांदे पडलेले होते. त्यांची देहबोली पाहून त्यांचे मुख्यमंत्रीपद जाणार हे नक्की असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केसरकरांकडून सारवासारव

दरम्यान, विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. तसेच नाराजीचे काहीच कारण नाही, असे म्हणत त्यांनी सारवासारव केली.

अखेर खुर्ची गेली! एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

…तर शिंदे-अजित पवारांचीही गरज नाही

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 137 जागांवर विजय मिळाला. राज्यात बहुमताचा आकडा 145 आहे. अपक्ष आणि शिंदे-अजित पवार गटात पेरलेल्या उमेदवारांना हाताशी धरून भाजप एकट्याच्या बळावरही सरकार बनवू शकते. त्यामुळे शिंदे-अजित पवार यांना भाजपसोबत राहण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात 85 टक्के उमेदवारांचे डिपॉजिट जप्त; सर्वाधिक उमेदवार मनसे, वंचित आणि बसपाचे