शिंदेंचा ताप वाढला; आता म्हणतात, मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री पद हाती लागत नाही याची खात्री पटल्यानंतर इतर महत्त्वाची खाती मिळवण्याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडपड सुरू आहे. गावी गेल्यानंतर शिंदेंना ताप चढला होता. तो आज उतरल्याचा दावा करत त्यांनी गावकऱ्यांचा निरोप घेऊन पुन्हा ठाणे गाठले. पण शारीरिक ताप उतरला असला तरी शिंदेंचा राजकीय ताप मात्र वाढला आहे. गृह, नगरविकाससह महत्त्वाची खाती मिंधे गटाला देण्यास भाजपमधील अनेकांचा विरोध आहे. त्यामुळे मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे म्हणत भारतीय जनता पार्टी घेईल तो निर्णय मान्य आहे, याचा पुनरुच्चार आज शिंदे यांनी केला.

दरेगावातून निघताना एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलले. तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली जात असल्याचे प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, तर कॉमन मॅन, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जो निर्णय घेतील त्याला पूर्णपणे पाठिंबा असेल, असे ते म्हणाले. माझा निर्णय झालाय, असे विधानही त्यांनी केले.

महायुतीत ‘गृह’कलह

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री ठरलेला नाही यावरून महायुतीवर टीका होऊ लागली आहे. नेमके अडलेय कुठे, असा प्रश्न केला जात आहे. गृहखाते कोणाला द्यायचे यावरून महायुतीमध्ये कलह सुरू असल्यानेच शपथविधीचा मुहूर्त पुढे पुढे ढकलला जातोय असे सांगितले जाते.

दादा गटाने डिवचले…

मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते असते असे सांगत अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आज मिंधे गटाला डिवचले. मागच्या वेळी मुख्यमंत्रीपद मिंधे गटाकडे तर गृहमंत्रीपद भाजपकडे होते. यावेळी तोच नियम लावला जावा यासाठी मिंधे गट आग्रही आहे, मात्र अजित पवार गटाचा त्याला विरोध आहे.

शिंदे दरेगावातून परतल्यानंतर रात्री मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल अशी चर्चा होती. शिंदे सायंकाळी पाचच्या सुमारास हेलिकॉप्टरने ठाण्यात आले. आज महायुतीची बैठक होणार का, असे तिथे पत्रकारांनी त्यांना विचारले असता काहीच न बोलता ते निवासस्थानाकडे निघाले.

मुख्यमंत्री आज ठरणार?

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषित करून टाकले आहे. त्याला आता तीनच दिवस उरले आहेत. भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदावर दावा केला असला तरी अद्याप त्यांचा गटनेता ठरलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या भाजप आमदारांची बैठक होणार आहे. त्यात गटनेत्याची निवड केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.