भाजपच्या उमेदवारीने मुखेड-कंधारमध्ये बंडखोरी; मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अपक्ष म्हणून मैदानात

मुखेड-कंधार मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी ऊफाळली आहे. भाजपाने विद्यमान आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी देताच मुख्यमंत्र्यांचे माजी खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली. दरम्यान, भाजप नेते माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी सभापती अशोकराव पाटील रावीकर, गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी खतगावकर यांचा प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी शासकीय पदाचा राजीनामा देऊन चार महिन्यांखाली शिवसेना मिंधे गटात प्रवेश करून मुखेड -कंधार विधानसभा मतदारसंघावर दावेदारी ठोकली होती. तसेच मुखेड शहरात कार्यालय थाटून प्रचारही सुरू केला होता. अनेक मोठमोठे कार्यक्रम घेतले. मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याने उमेदवारी मिळेल, असा खतगावकर यांचा कयास होता. तर दुसरीकडे भाजपाचे विद्यमान आमदार तुषार राठोड गटात अस्वस्थता पसरली होती. आमदार तुषार राठोड यांनी खतगावकरांच्या प्रचाराची मुख्यमंत्री व फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. महायुतीने भाजपाचे आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी जाहीर करताच खतगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार राठोड यांनी तालुक्याचा कुठलाही विकास केला नसल्याची टीका करत अपक्ष लढण्याची घोषणा केली.

यावेळी व्यासपीठावर भाजपाचे नेते माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपाचे माजी सभापती अशोक पाटील रावीकर, भाजपाचे सरपंच नारायण गायकवाड, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाबुराव कदम, गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे भाजपाच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. खतगावकर यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारास फायदा होणार असल्याची चर्चा आहे.