मिंधे गटाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे विक्रमगडमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्या प्रचारात मिंधेंचे पदाधिकारी सक्रीय झाल्याने भाजपचा उमेदवार धोक्यात आला आहे. त्यामुळे मिंधेंच्या पालघर आणि बोईसरमधील उमेदवारांचा प्रचार न करण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला असून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
जागा वाटपात भाजपने विक्रमगडची जागा आपल्याकडे कायम ठेकल्याने नाराज झालेल्या मिंधेंचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जिजाऊ सामाजिक संघटनेचा आसरा घेतल्याने विक्रमगडमध्ये भाजपचे हरिश्चंद्र भोये यांच्या समोर अडचणी काढल्या आहेत. निकम यांना मिंधेंचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचे पदाधिकारी उघडपणे भोये यांचे काम न करता निकम यांचा प्रचार करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्याकडे तक्रार केली आहे.
विक्रमगडमध्ये मिंधे गटाने अशीच आपली आडमुठी भूमिका घेतल्यास पालघर आणि बोईसरमध्ये मिंधेंच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालघर जिह्यात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. बंडखोर उमेदवार प्रकाश निकम व त्यांच्यासोबत प्रचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकर कारवाई करण्याची मागणी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.