हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ज्या पवित्र आनंदाश्रमात धर्मवीर आनंद दिघे यांनी हिंदुत्वाचे आणि समाजसेवेचे अग्निकुंड चेतवले त्याच वास्तूत मिंधेंच्या पंटरांनी सत्तेचा अक्षरशः उन्माद दाखवला. गोरगरीबांना जेथे न्याय मिळाला त्या आनंदाश्रमात मिंध्यांच्या बगलबच्चांनी आनंद दिघे यांच्या तसबिरीभोवती नोटांची बंडले ओवाळ्tन उडवत ती चक्क पायदळी तुडवली. आनंदाश्रमातील या कृत्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांसह ठाणे शहर आणि जिह्यात संतापाची लाट उसळली. या गद्दारांना आता क्षमा नाही. त्यांना अद्दल घडवणारच, असा निर्धार ठाणेवासीयांनी केला.
View this post on Instagram
शिवसेनेशी गद्दारी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत गेले. ठाणे हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यातील आनंदाश्रमावरही एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नावाची पाटी लावून त्यावर कब्जा केला. या वास्तूमध्ये 24 तास गरीबांना मदत करण्याचे काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केले, मात्र फोडाफोडी करणाऱया मिंध्यांनी या आनंदाश्रमाचा ताबा घेऊन त्याला कॉर्पोरेट लूक दिला. आता तर साक्षात धर्मवीरांच्या तसबिरीसमोरच मिंध्यांच्या बगलबच्चांनी धिंगाणा केला. दिघे यांच्या तसबिरीसमोर नोटांची बंडले ओवाळत त्याची उधळण करीत बेभानपणे नाच करत असल्याचे किळसवाणे व संतापजनक दृश्य पाहण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे.
ही तर हद्द झाली
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही बगलबच्चे ढोलताशांच्या तालावर नाच करीत असल्याचे दिसत आहे, तर काही जण धर्मवीरांच्या तसबिरीभोवती नोटा फिरवून त्या उधळत असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. यापूर्वी विजयाचा आनंद झाला तर आनंदाश्रमाच्या बाहेर जल्लोष होत असे. गुलालाची उधळणदेखील केली जायची, पण ऐन गणेशोत्सवाच्या काळात तर हद्द झाली असून मिंध्यांनी पवित्र वास्तूच्या आतच ढोलताशे घुसवून नाच करण्याचा आपला पंडू शमवल्याचे दिसून आले आहे.
तेव्हा वाटल्या… आता भिरकावल्या…
लोकसभा निवडणुकीच्या काळात आनंदाश्रमामध्ये बचत गटातील महिलांना बोलावून त्यांना पैसे वाटले होते. त्याचा व्हिडीओदेखील प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. आता तर त्याहूनही अधिक कळस गाठण्यात आला असून ढोलताशांचा धांगडधिंगा आणि नोटा भिरकावल्याचा व्हिडीओ वाऱयासारखा पसरला आहे. हाच का धर्मवीरांबद्दलचा तुमचा सन्मान, असा एकच सवाल फेसबुक, व्हॉट्सअॅप, एक्सवरून विचारला जात आहे.
हे पाप नव्हे, तर महापाप
‘मातोश्री’च्या पाठीत खंजीर खुपसणाऱया एकनाथ शिंदे व त्यांच्या बगलबच्चांचा पापाचा घडा आता काठोकाठ भरला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आश्रमात नोटा उडवण्याचा प्रकार म्हणजे फक्त पाप नव्हे तर महापाप असून दिघे यांचे शिष्य म्हणवून घेण्याची तुमची लायकी तरी आहे काय, अशा आशयाच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून व्यक्त होत आहेत.
समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले
केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराचे स्थान असलेल्या आनंदाश्रमात तुम्ही नोटा उधळल्या.. हा प्रकार अतिशय संतापजनक तसेच निंदनीय असून दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले आहे. आमचा आनंद हरपला आहे. मिंध्यांचे त्यांच्याबद्दल असलेले प्रेम किती खोटे आहे हेच यातून सिद्ध होते. यांचेच नेते पूर्वी दिघे साहेबांच्या प्रतिमेसमोर उभे राहून एकमेकांना पुष्पगुच्छ देत होते. ज्यांना आपण देव मानतो, ज्यांची आपण पूजा करतो त्यांच्या प्रतिमेसमोर नोटांची उधळण करणे ही बाब अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे.
– केदार दिघे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख
– व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही बगलबच्चे धर्मवीरांच्या तसबिरीभोवती नोटा फिरवून त्या उधळत असल्याचे समोर आले आहे.