मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच एकमेकांची डोकी फोडली

कल्याणमध्ये मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाला त्यांच्याच गटाच्या कार्यकर्तीने भररस्त्यात धू धू धुतले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मिंधे गटात राडा झाला. माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी दिलीप दाखिणकर यांचे डोके फोडले. थेट पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली.

कल्याणमध्ये मिंधे गटात गट तट पडले आहेत. सोमवारी कल्याण पश्चिम येथे राणी कपोते यांनी मोहन उगले यांना भरबाजारपेठेत लाथाबुक्क्यांनी तुडवले होते. तोच आज कल्याण पूर्वेत पुन्हा मिंधे गटात पाणी प्रश्नावरून झालेला वाद थेट कोळशेवाडी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच शिंदे गटाचे पदाधिकारी दिलीप दाखिणकर आणि मल्लेश शेट्टी एकमेकांमध्ये भिडले. यावेळी दोघांमध्ये कॉलर पकडून हाणामारी झाली. यामध्ये दिलीप दाखिणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मल्लेश शेट्टी यांनी मारहाण केल्याचा आरोप दाखिणकर यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रार दाखल करून घेतली आहे.