मिंधेंच्या नकली सेनेकडून छत्रपतींच्या गादीचा आज घोर अपमान झाला. आत्ताचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार नाहीत, अशी मुक्ताफळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी उधळली. थेट छत्रपतींच्या गादीचीच जाहीर बदनामी झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय, सामाजिक अशा सर्वच स्तरांतून मंडलिकांच्या वक्तव्याची निंदा केली जात आहे.
कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर मिंध्यांनी संजय मंडलिक यांना तिकीट दिले आहे. मंडलिक यांची प्रचारसभा नुकतीच कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झाली. त्या सभेत मंडलिक यांनी शाहू महाराजांबद्दल संतापजनक विधान केले.
‘मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही मग ती कुस्ती कशी होणार? अशात गादीचा अपमान झाला की काय, असा कांगावा केला जातो. यानिमित्ताने सांगितले पाहिजे की, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? छत्रपतींच्या गादीचे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार’ असे संजय मंडलिक या सभेमध्ये म्हणाले. मंडलिक यांच्या हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱयातून त्यांचा निषेध होत आहे.
मंडलिकांनी जाहीर माफी मागावी
शाहू महाराजांवर कुणीही वैयक्तिक टीका करणार नाही, असे संजय मंडलिक यांनी जाहीर सांगितले होते. पण पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांनी जाहीर माफी तर मागितलीच पाहिजे, पण या वक्तव्याबद्दल कोल्हापूरकर जनताही निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल. मंडलिक यांना कोल्हापुरी बाणा दाखवू, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली. कुस्ती जरूर करा, पण खालच्या पातळीवरची कुस्ती सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी मंडलिक यांना दिला.
अत्यंत निंदनीय वक्तव्य
कोल्हापूरच्या गादीविषयी संजय मंडलिक यांनी काढलेले उद्गार अत्यंत निंदनीय असून त्यांना कोल्हापूरकर उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मंडलिक यांचे उद्गार भाजपच्या ग्रँड स्टॅटेजीचा भाग तर नाही ना?’ असा सवालही त्यांनी केला आहे.
विरोधकांची मानसिकता काय आहे हे दिसतंय!
छत्रपती शाहू महाराज हे सेवेचा आदर्श ठेवून काम करत आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करताहेत यावरून विरोधकांची मानसिकता काय आहे आणि ते कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात हे दिसतेय, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा निषेध केला. ‘शाहू महाराजांविषयी जनमानसात आदर आहे. राजघराण्यावर दत्तक गोष्टी नव्या नाहीत. दत्तक घेतल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो. शाहू छत्रपतींच्या कार्याविषयी जनतेमध्ये कृतज्ञता आहे’, असे शरद पवार म्हणाले.