महाराष्ट्रात गुंडाराज, कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या; मिंधेंचे आमदार थोरवेंच्या बॉडीगार्डचा लोखंडी रॉडने कारचालकावर अमानुष हल्ला

मिंधे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मस्तवाल बॉडीगार्डने एका कारचालकावर भररस्त्यात लोखंडी रॉडने अमानुष हल्ला केल्याची घटना नेरळ येथे घडली. कार अडवून या हल्लेखोर बॉडीगार्डने कारचालकावर एकापाठोपाठ एक असे लोखंडी रॉडचे घाव घातले. कारचालक आणि त्याची पत्नी व मुलगा धायमोकलून रडत असतानाही मिंधे आमदाराच्या या हल्लेखोर बॉडीगार्डला पाझर फुटला नाही. शिवा ऊर्फ शिवाजी सोनावणे असे या हल्लेखोराचे नाव आहे.  मिंधेंच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात गुंडाराज फोफावले असून कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नेरळ-कळंब मार्गावर पाडा येथील राजबाग या उच्चभ्रू सोसायटीच्या प्रवेशद्वारावर अमर बांदल हे आपल्या कुटुंबासह त्यांच्या कारमधून निघाले होते. त्यावेळी मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा ऊर्फ शिवाजी सोनावळे हा तेथे आला आणि त्याने बांदल यांच्या कारचा दरवाजा उघडून त्यांच्यावर एका पाठोपाठ एक लोखंडी रॉडने घाव घातले. ‘अरे बाबा माफ कर…’ असे बांदल ओरडत असतानाही शिवा याने बॅटिंग करण्याच्या स्टाईलने लोखंडी रॉडचे घाव त्यांच्या पायावर आणि छातीवर घातले. गाडीत असलेली बांदल यांची पत्नी आणि मुलगा मोठमोठ्याने रडू लागले. मारू नका… मारू नका… असे पत्नी ओरडत होती, परंतु शिवाला पाझर फुटला नाही. दुर्दैवाची बाब अशी की जिवाच्या भीतीने आजूबाजूला असलेले गाडीचालक मदतीला धावले नाहीत. एका गाडीतील चालकाने या मारहाणीचे शूटिंग केले आणि तो व्हिडीओ व्हायरल केल्याने मिंध्यांच्या या गुंडगिरीला वाचा फुटली.

कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या; लोकांचे हाल

मिंधे आमदाराच्या बॉडीगार्डने केलेल्या या मारहाणीचा व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘एक्स’ प्रसारमाध्यमावर पोस्ट केला आहे. हा सुरक्षारक्षक आहे की गुंड? मिंधेंची राजवट फक्त गुंडांसाठीच. भररस्त्यात हा गुंड एका व्यक्तीला मारहाण करतोय… त्या व्यक्तीची पत्नी, मुले रडताहेत. मिंधेंच्या राजवटीत कायद्याच्या चिंधड्या आणि लोकांचे हाल सुरू आहेत. ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढली आहे, कायदा-सुव्यवस्थेची वाट लागली आहे. कारण गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसला आहे.

 

पोलीस म्हणतात, आम्ही शोध घेत आहोत!

मिंध्यांचे आमदार महेंद्र थोरवे यांचा खासगी बॉडीगार्ड शिवा ऊर्फ शिवाजी सोनावळे हाच मारहाण करत असल्याचे व्हिडीओतून स्पष्टपणे दिसत असतानाही नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी ढवळे यांना विचारणा केली असता त्यांनी अजून तरी आम्हाला काहीच कळले नाही असे सांगत हात झटकले. आमच्याकडे कोणाची तक्रार नाही. व्हिडीओच्या माध्यमातून मारहाण झालेल्या वाहनचालकाचा आम्ही तपास घेत आहोत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मारहाण करणारा तरुण आणि त्याच्या गाडीचा नंबर मिळवण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा आम्ही लवकरच छडा लावू असे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी सांगितले. मात्र रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा नोंदवून सोनावळेला अटक केली. गाडीची काच फुटण्यावरून वाद झाला होता असे त्यांनी सांगितले. नेरळच्या भर नागरी वस्तीत एका कुटुंबावर लोखंडी रॉडने हल्ला होत असताना आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असतानाही नेरळ पोलिसांना हे प्रकरण दडपायचे आहे, असा सवाल कर्जतवासीय करत आहेत.