अरेरे काय दुर्दैव! पालकमंत्री पदाच्या वादामुळे ‘छावा’च्या विशेष स्क्रीनिंगला मिंधेंच्या मंत्र्यांची गैरहजेरी?

eknath-shinde-group-minister-chhava-screening-maharashtra-budget-session-raigad-guardian-minister-post-row-ajit-pawar-group

छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा छावा (Chhaava) चित्रपटाच्या माध्यमातून देशभरात पाहिली जात आहे. महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने बुधवारी मंत्री आणि आमदारां साठी याचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्री अदिती तटकरे यांनी चालू महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन केलं होतं. मात्र मिंधे गटाचे मंत्री या शो साठी गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं. त्याचं कारण आता समोर येत आहे. रायगड पालकमंत्रीपदाच्या वादामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांनी छावा या बॉलीवूड चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे.

इंडिया टुडेत यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. मिंधे गटाकडून छावा चित्रपटाच्या स्क्रीनिंगला केवळ राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादामुळे मिंधेगटाने जाणूनबुजून टाळाटाळ केली आहे, असा अंदाज वर्तवला जात होता.

रायगड पालकमंत्रीपद हा मिंधे गट आणि अजित पवार गटामधील वादाचा मुद्दा आहे. मिंधे गट या पदावर ताबा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे, परंतु अजित पवार गटही रायगडच्या पालकमंत्री पदासाठी ठाम असून आपला दावा सोडण्यास त्यांनी विरोध केला आहे.

ईडी आणि सीबीआयला घाबरून पळालेल्या गद्दारांना ‘छावा’ दाखवा, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

पालकमंत्र्यांकडे जिल्ह्याचा प्रत्यक्ष कारभार असतो आणि ते त्यांच्या राजकारणातील एक प्रमुख शक्ती केंद्र आहेत. विकास प्रकल्पांसाठी निधी वाटप करणाऱ्या जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) च्या बैठकीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे असते.

रायगडमध्ये मिंधे गटाचे भरत गोगावले यांनी दावा केला आहे, तर राज्याच्या विद्यमान महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांनी देखील या पदासाठी प्रयत्न ठेवले आहेत.

गेल्या महिन्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील रायगड नियोजन बैठकीला मिंधेंचे मंत्री उपस्थित राहिले नाहीत तेव्हा दोन्ही पक्षांमधील तणाव स्पष्ट झाला होता. तटकरे उपस्थित असलेल्या या बैठकीतून दोन्ही पक्षांमधील खोलवरचे मतभेद अधोरेखित झाले. सध्या रायगडमध्ये मिंधे गटाचे थोरवे, दळवी आणि गोगावले (महाड) आणि अजित पवार गटाचे तटकरे (श्रीवर्धन) हे चार आमदार आहेत.