
एका चर्मकार महिलेकडून दोन शिलाई मशीनची लाच घेऊन तिला मिंधे गटाच्या शहापूरच्या नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत आणि नगरसेवक राजाराम वळवी यांनी दमदाटी केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाहीतर कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेऊन हे काम परस्पर दुसऱ्या ठेकेदाराला दिले आहे. याप्रकरणी नगराध्यक्षा गायत्री भांगरे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
जिजामाता सामाजिक संस्थेच्या संस्थापिका असलेल्या आसनगाव येथील चर्मकार महिलेला केक मेकिंग व पोलीस भरती प्रशिक्षण या योजनेचा ठेका मिळाला होता. मात्र शहापूर नगरपंचायतीच्या महिला कर्मचारी हुलवले यांच्या माध्यमातून या चर्मकार महिलेला मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले. तुम्हाला मिळालेले काम छोटे आहे ते दुसऱ्याला द्या, आम्ही तुम्हाला दुसरे मोठे काम देतो असे अशी बतावणी करून या महिलेच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली. या नवीन कामासाठी महिलेकडे लाचेचीही मागणी करण्यात आली. लाच म्हणून नगरसेवक राजाराम वळवी यांनी पन्नास हजारांच्या दोन शिलाई मशीन या महिलेकडून घेतल्या.
शिलाई मशीन ताब्यात आल्यानंतर मात्र मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या महिलेला टाळण्यास सुरुवात केली. या महिलेने कामाबाबत वारंवार विचारणा केली असता तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
चर्मकार महिला नगरसेवक वळवी यांच्याकडे गेली असता त्यांनी तिला दमदाटी केली. काम मिळणार नाही, तुला काय करायचे ते करून घ्या. तुझी दुसऱ्या ठिकाणी असलेली कामे बंद करतो, अशी धमकीही दिली.
■ नगराध्यक्षा गायत्री भांगरे यांनीही या महिलेला फोन केला आणि नगरपंचायतीच्या कार्यालयात पाय ठेवला तर याद राखा असे दरडावले.
हे धमकी सत्र सुरू असतानाच उपनगराध्यक्ष विजय भगत यांनीदेखील या महिलेला धमकावले. भगत यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.